पुणे: ऊसतोडणीसाठी काही लाखांच्या संख्येने स्थलांतरीत होणार्या ऊसतोडणी कामगारांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न गुरूवारी अंधातरीच राहिला. साखर संघ व कामगार संघटना प्रतिनिधींमधील दोन तासांची चर्चा निष्फळ ठरली. संघटनांमधील राजकीय मतभेदांमुुळे एकमत झाले नाही. त्यामुळे आता यावरील अंतिम निर्णय सरकारकडूनच होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कोणीही कामगार घराबाहेर पडणार नाही व एकही कोयता ऊचलला जाणार नाही असे प्रमूख ८ कामगार संघटनांच्या वतीने गहिनीनाथ थोरे यांंनी स्पष्ट केले. ज्येष्ठ नेते शरद पवार घेतील ती भूमिका मान्य असेल, लवाद वगैरे आम्हाला मान्य नाही असे ते म्हणाले. तर माजी मंत्री पंकजा मुंडे यांना मानणार्या महाराष्ट्र ऊसतोडणी वाहतूक मुकादम संघटनेचे पदाधिकारी, माजी आमदार केशव आंधळे यांंनी आम्हाला पंकजा मुंडे- जयंत पाटील यांचा लवाद मान्य असून त्या घेतील तो निर्णय अंमलात आणू असे सांगितले.
साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांंनी साखर संघ सरकारकडे कामगार संघटनांचे म्हणणे मांडणार आहे असे सांगितले. त्या सर्वांच्याच भावना ऐकल्या आहेत. कामगारांच्या आरोग्य सुरक्षेबाबत सरकारला याआधीच पत्र लिहिले आहे, मजुरीतील दरवाढ व अन्य गोष्टी आता पुढे आल्यात, त्यावर संचालक मंडळात चर्चा होईल व सरकारला त्याप्रमाणे कळवले जाईल असे दांडेगावकर म्हणाले.
बैठकीसाठी म्हणून ऊसतोडणी कामगार संघटनांचे थोरे, जीवन राठोड, सुशिलाताई मोराळे व अन्य प्रतिनीधींबरोबर सकाळी ११ वाजताच साखर संकुलात ऊपस्थित होते. दांडेगावकर यांंनी त्यांना कोरोना मुळे कोणत्याही बैठका घ्यायला महापालिका आयुक्तांनी मनाई आदेश बजावला असल्याची माहिती दिली व एकत्रित बैठकीला सुरूंग लागला. एकावेळी दोन संघटनांचे प्रत्येकी एक याप्रमाणे दोन प्रतिनिधींबरोबर चर्चा करू असे सांगितले. त्यांच्यासमवेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राजेंद्र नागवडे व अन्य संचालक होते.
थोरे यांंनी, तसेच अन्य संघटनांच्या प्रतिनीधींनीही अशा चर्चेला नकार दिला. मात्र दांडेगावकर ठाम राहिल्याने अखेर तशीच चर्चा झाली व निष्फळ ठरली. सरकारला सर्व माहिती कळवू, आता सरकारच यावर निर्णय घेईल असे दांडेगावकर म्हणाले.
---///
साखर संघाने सरकारला कोरोना विम्याबाबत पत्र दिले आहे. या विम्याचा हप्ता जास्त आहे, त्यामूळे सरकार,साखर संघ व कामगार अशा तिघांनीही हप्त्याची जबाबदारी घ्यावी अशी सरकारकडे मागणी केली आहे.- जयप्रकाश दांडेगावकर; अध्यक्ष, साखर संघ.(३१३)