मुंबई - राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. एकेकाळी मित्र असलेले भाजपा-शिवसेना एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी बनल्या आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादीनं शिवसेनेशी जवळीक साधली आहे. राज्यातील या राजकीय वातावरणात मनसे कायम चर्चेत असते. त्यात शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे उभी फूट पडल्याचं चित्र आहे. शिवसेनेत ठाकरे कुटुंबालाच आव्हान निर्माण झालं आहे.
उद्धव ठाकरेंच्या या परिस्थितीत राज-उद्धव हे दोन भाऊ एकत्र येणार का? असा प्रश्न पुण्यात पत्रकारांनी राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंना विचारला. त्यावर तुम्हाला वाटतं का असा प्रतिप्रश्न शर्मिला ठाकरेंनी केला. त्यानंतर जर उद्धव ठाकरेंनी साद घातली तर मनसे-शिवसेना एकत्र येईल असं पत्रकारांनी विचारल्यानंतर साद घातली तर येऊ देत, मग बघू सांगत शर्मिला ठाकरेंनी सांगितले.
शर्मिला ठाकरेंच्या या विधानानंतर पत्रकारांनी सांगोला दौऱ्यावर असलेल्या शिवसेना खासदार विनायक राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले की, अद्याप अशाप्रकारे कुठलीही माहिती माझ्याकडे आली नाही. जर असा काही निर्णय घ्यायचा असेल तर आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेण्यास सक्षम आहेत असं म्हटलं आहे. त्यामुळे मनसे-शिवसेना एकत्र येणार यावर थेट नकारात्मक भाष्य करणं दोन्हीकडून टाळण्यात आले.
आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजपा-शिंदे गट एकत्रित निवडणूक लढणार आहेत. तर महाविकास आघाडीकडून अद्याप काहीच निश्चित झाले नाही. मुंबई महापालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी शिवसेना जोरदार तयारी करत आहे. तर बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार म्हणत भाजपानेही थेट मुंबई महापालिकेत यंदा महापौर भाजपाचाच बसवणार असा निर्धार व्यक्त केला आहे. या राजकीय लढाईत मनसेनेही पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे मनसे स्वबळावर निवडणुका लढणार की आगामी महापालिकेत ठाकरे बंधु एकत्र दिसणार याची उत्सुकता सर्व जनतेला लागून राहिली आहे.