आता जे झाले ते झाले, उमेदवारी जाहीर झालीय. मविआत पुढची जागावाटपाची चर्चा २०२९ ला असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून काँग्रेसच्या नेत्यांना ठणकावून सांगितले होते. यावर नाना पटोले यांनी मोठा खुलासा केला आहे. सांगली, भिवंडी आणि मुंबई जागेवर चर्चा थांबली होती, काल बैठक झाली, असे पटोले म्हणाले आहेत.
राहुल गांधी किंवा खर्गे यांच्याशी चर्चा करण्याची काही गरज नाहीय. आघाडी-युतीमध्ये शेवटपर्यंत जागावाटपावरून दावे-प्रतिदावे सुरु राहतात. भाजपासोबतही युतीवेळी हे असेच होत होते. ही गोष्ट मविआमध्येही लागू होते. जागावाटपाबाबत जे काही व्हायचे होते ते होऊन गेले. आता यामध्ये काहीही उरलेले नाही. आता आघाडीमध्ये जागावाटपाची जी चर्चा होईल ती २०२९ ला होणार, असे उद्धव ठाकरे दिल्लीत प्रसारमाध्यमांना म्हणाले आहेत. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून काही वाद नाही. आदा उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर काँग्रेसलाही समजले आहे, असे ठाकरे म्हणाले होते.
यावर दिल्लीतून काय चर्चा झाली, ते आदेश देणार, त्याचे पालन करू, असे पटोले म्हणाले आहेत. तसेच प्रकाश आंबेडकरांना अकोल्यात पाठिंबा देणार का या प्रश्नावर आम्ही कुठलेही समर्थन मागितले नाही, असे पटोले यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांना द्यायचे असेल, तर ते देऊ शकतात. समर्थन द्यायचे आहे तर सगळ्याच जागेवर द्यावे, ठराविक नाही, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.
रश्मी बर्वे विषय संपला आहे. आता काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत ते निवडून येतील. मी पण वंचित आहे. शेतकऱ्यांचा मुलगा आहे. मला व्यक्तिगत टॉर्चर केले जात आहे. हे काही बरोबर नाही, त्याचे उत्तर योग्य वेळी देऊ, असा इशाराही पटोले यांनी दिला.