एकलारा बानोदा : डेंग्यू या ताप रोगाने दहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून, आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. एकलारा येथील आरती अशोक हागे या बालिकेला ताप आल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. उपचारानंतर ताप बरा होत नसल्याने घरातील मंडळींनी तिला अकोला येथील खासगी रुग्णालयात भरती केले. दरम्यान, प्रकृती खालावल्याने अखेर तिचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला. अकोला येथील खासगी दवाखान्यातील अहवालानुसार तिचा मृत्यू हा डेंगी तापाने झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे गावात खळबळ उडाली असून, अजूनही गावात अशा आजाराचे रुग्ण आहेत काय, या बाबत आरोग्य विभागाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
** आरोग्य पथक दाखल
गावातील एका दहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभाग खळबळून जागा झाला. शुक्रवार आणि शनिवारी वानखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक गावात ठाण मांडून बसले आहेत. गावातील विविध घरांच्या सर्व्हेसोबतच पिण्याच्या पाण्याच्या भांड्यांचीही तपासणी आरोग्य पथकाकडून करण्यात आली. या पथकामध्ये वानखेड येथील आरोग्य सहा एस.पी. पिसे यांच्यासह अनेक कर्मचार्यांचा समावेश आहे. बुलडाणा येथील आरोग्य पथकही आज शनिवारी गावात धडकले होते.