मुंबई : पावसाळा सुरू झाल्यावर मुंबईत डेंग्यू, मलेरिया, ताप, गॅस्ट्रो असे साथीचे आजार डोके वर काढू लागतात. मान्सून परतला असला तरीही साथीच्या आजारांनी अजूनही मुंबईत काढता पाय घेतलेला नाही. ठिकठिकाणी साचून राहिलेल्या पाण्यामुळे तिथे डासांची पैदास होऊन चिकुनगुनिया, डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार होण्याचा धोका मुंबईकरांना आहे. त्यातच आॅक्टोबर महिन्यात चिकुनगुनियाचे रुग्ण आढळून आल्याने मुंबईकरांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. आॅक्टोबर महिन्यात पहिल्यांदाच चिकुनगुनियाचे ४ रुग्ण आढळून आले असून, २४ चिकुनगुनियाचे संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पावसाळा संपताना पुन्हा एकदा महापालिकेपुढे नवे आव्हान उभे ठाकले आहे. यंदा पावसाळ्यात पुन्हा एकदा डेंग्यूने मुंबईत डोके वर काढले होते. पण, आॅक्टोबर महिन्यात आता चिकुनगुनियाचे रुग्ण आढळू लागले आहेत. एडिस इजिप्ती डासामुळेच चिकुनगुनियाची लागण होते. ताप, डोकेदुखी, अंगावर पुरळ उठणे ही या तापाची सामान्य लक्षणे आहेत. पावसाळा संपल्यावर अनेकदा छपरावर टाकलेल्या ताडपत्र्या काढल्या जात नाहीत. एसी साफ केले जात नाहीत. अडगळीत टाकलेल्या वस्तू टाकून दिल्या जात नाहीत. या ठिकाणी पाणी तसेच साचून राहते. या साचलेल्या पाण्यात एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे पावसाळा संपल्यावर घराची आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता केली पाहिजे. महापालिकेतर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. आॅक्टोबरमध्ये १ हजार ९१ घरांची तपासणी करण्यात आली आहे. तर, १ हजार १३० कंटेनरचीदेखील तपासणी करण्यात आली आहे. घरांत, झोपडपट्टी परिसरात आणि अन्य परिसरात धूरफवारणी सुरू आहे. (प्रतिनिधी)>डासांची पैदास रोखण्यासाठी काय करावेघरात डास येऊ नयेत म्हणून दार-खिडक्या बंद ठेवा. घरात डास झाले असल्यास झोपताना जाळीचा वापर करा.डासांची पैदास रोखण्यासाठी स्वच्छता करा, साचलेले पाणी साफ करा.घरातील मनीप्लाण्ट, फेंगशुई प्लाण्टमधले पाणी बदला. संपूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे परिधान करा.
आॅक्टोबर महिन्यातही डासांचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2016 4:25 AM