पुणे : मंत्रिमंडळात फेरबदल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना फारसे विश्वासात घेतले नाही. विनय सहस्त्रबुद्धे व राम माधव यांना मंत्रिपद न दिल्याने नाराजी आहे. सरकारकडे चांगल्या क्षमतेचे मंत्री नाहीत हेही जगजाहीर आहे. तसेच मोदींच्या एकला चलो धोरणामुळे संघात त्यांच्याविषयी खदखद सुरू झाली आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे सांगितले.तसेच समविचारी पक्षांनी एकत्र येण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेचेही चव्हाण यांनी समर्थन केले.महाराष्ट्र मीडियाच्या वतीने चव्हाण यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवेदक सुधार गाडगीळ यांनी चव्हाण यांच्याशी संवाद साधला. चव्हाण यांनी मुलाखतीच्या सुरुवातीलाच मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. नोटाबंदीचा निर्णय चुकीचा असल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी मोदी हे सारासार विचार करून निर्णय घेत नसल्याचे सांगितले.लोकांकडील नोटा गायब करून क्रेडिट व डेबिट कार्डला खुली छूट दिली. लोकांना त्याकडे जबरदस्तीने वळविले. मात्र त्यांची सर्व उद्दिष्टे फेल ठरली आहेत. बुलेट ट्रेनचा निर्णयही नोटाबंदीइतकाच अविचारी आहे. अनेक प्रश्न असताना अहमदाबादला प्राधान्य मिळावे यासाठी बुलेट ट्रेनचा निर्णय घेतला. त्यांनी निवडणुकीपूर्वी खूप घोषणाबाजी केली. पण एकही पूर्ण झाली नाही. केवळ सवंग लोकप्रियतेसाठी या घोषणा करण्यात आल्या. तसेच त्यांनी निवडणुकीत हिंदीचाही प्रभावी वापर केला. याबाबतीत काँग्रेसचे नेते मागे पडले. त्यामुळे आमचा धक्कादायक पराभव झाला. मोदी यांच्या तोडीचा नेता काँग्रेसमध्ये नसल्याची कबुलीही त्यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे दिली.आगामी निवडणुकीत समविचारी पक्षांनी एकत्र येण्याच्या शरद पवार यांच्या भूमिकेचे समर्थन चव्हाण यांनी केले. आजचे अंकगणित पाहिले तर आमचा पक्ष कमी पडत आहे. एकला चलोची भूमिका घेतली तर आम्ही टिकणार नाही. आमचे काही बाबतीत मतभेद आहेत. राष्ट्रवादीबद्दल आजही स्पष्टता वाटत नाही. तरीही पवारांच्या भूमिकेचे समर्थन करतो. विरोधकांना एकत्र यावेच लागणार आहे. मोदींना सुरुवातीला सोशल मीडियाने जसे डोक्यावर घेतले तसे आता जोरात आपटले आहे. लोकांच्या मानसिकतेचे प्रतिबिंब त्यातून दिसून येत आहे. आमच्या सरकारने केलेल्या योजनाच मोदी सरकार पुढे आणत आहे. सध्या काँग्रेसही रस्त्यावर यायला कमी पडत आहे, असे चव्हाण यांनी नमूद केले.-----------गृहमंत्रिपद सोडले ही चूक!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते स्वत:कडे ठेवून खूप शहाणपणाचा निर्णय घेतला. दुर्दैवाने हे खाते मला ठेवता आले असते तर खूप मोठा फरक पडला असता, अशी टिप्पणी चव्हाण यांनी केली. देशात आघाडी सरकार असलेल्या प्रत्येक राज्यांत हीच पद्धत आहे. पण मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी पहिल्यांदा हे खाते सोडले. तिथून पुढे ही पद्धत सुरू झाली, असे चव्हाण म्हणाले.
नरेंद्र मोदींविषयी संघात खदखद, विनय सहस्त्रबुद्धे व राम माधव यांना मंत्रिपद न दिल्याने नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 10:37 PM