नवी मुंबई : परराज्यातून कंट्रोलरूमवर आलेल्या फोनवरून नवी मुंबई पोलिसांनी पुण्यातील पाच वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा तिढा सोडवला आहे. आईवडिलांच्या निधनानंतर हा मुलगा संगोपनासाठी चुलत्यांकडे असताना तो बेपत्ता झाला होता. अखेर नवी मुंबई पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे या मुलाचा शोध लागला आहे. २७ मार्च रोजी उत्तरप्रदेशमधील एका व्यक्तीने नवी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षामध्ये फोन केला होता. त्याने वाराणसीमध्ये पाच वर्षांचा मुलगा आढळला असून तो महाराष्ट्रातला असल्याची शक्यता वर्तवली होती. नियंत्रण कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक आनंदा होडगे यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली चौधरी, हवालदार सुदाम पाटील, हिराजी राऊत यांनी त्या मुलाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. याकरिता त्यांनी मुलासोबत फोनवरून संभाषण केले; परंतु मराठी व हिंदीमध्ये बोलूनही त्याला काहीच स्पष्ट बोलता येत नसतानाही, पोलिसांनी सुमारे दीड ते दोन तास त्याच्यासोबत संभाषण केले. अखेर रूपाली चौधरी यांनी त्या मुलाची हिंदीत चौकशी करून गावाचे नाव विचारले. या वेळी त्या पाच वर्षीय मुलाने गॅसपेटा असे गावाचे नाव सांगितले. यावरून पोलिसांनी तपासाला पुण्याची थोडीफार माहिती असल्यामुळे गंजपेठ नावाचा भाग असल्याचे चौधरी यांना माहीत होते. यामुळे मुलाचा फोटो मागवून तो खडक पोलिसांपर्यंत पोहोचवून चौकशी केली. या वेळी काही सदर मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याचे उघड होऊन प्रेम तिवारी असे त्याचे नाव असल्याचे समोर आले. या कामगिरीचे कौतुक पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, उपआयुक्त सुधाकर पठारे, सहायक आयुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे. तसेच या कामगिरीबाबत उपनिरीक्षक रूपाली चौधरी यांना चार हजार रुपये, तर हवालदार सुदाम पाटील व हिराजी राऊत यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. (प्रतिनिधी)>...अन् प्रेमचे कुटुंब गहिवरलेप्रेम मिळाल्याचे ऐकून त्याच्या कुटुंबालाही अत्यंत आनंद झाला. प्रेमच्या आईवडिलांचे निधन झाले असल्याने संगोपनासाठी तो चुलत्यांकडे होता. काही दिवसांपूर्वी राहत्या परिसरातून तो संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याने त्याच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होता. मात्र, केवळ चौकशीसाठी आलेल्या फोनवरून नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करून त्याचा कुटुंबीयांशी संपर्क करून दिला आहे.
फोनवरून अपहरणाचा उलगडा
By admin | Published: April 03, 2017 3:23 AM