मुंबई : राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता कठोर कायदे आणण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरु असून, आंध्र प्रदेशने केलेल्या 'दिशा' कायद्याची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आंध्र प्रदेशला जाऊन तेथील सरकारकडून माहिती घेतली होती. तर विधानमंडळाचे अधिवेशन संपण्यापूर्वी महाराष्ट्रात 'दिशा' कायदा लागू करणार असल्याची माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली आहे.
महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे जलद गतीने चालवून निकाल मिळण्यासाठी आंध्र प्रदेशने केलेला 'दिशा' कायदा प्रभावी ठरत असल्याचे बोलले जात आहे. त्या अनुषंगाने प्रत्यक्ष आंध्र प्रदेशला जाऊन तेथील मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच पोलीस महासंचालक कार्यालयाला भेट देऊन या कायद्याची सविस्तर माहिती अनिल देशमुख आणि राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली होती.
त्यामुळे 'दिशा' कायदा तात्काळ महाराष्ट्रात लागू करण्याच्या हालचाली सरकारकडून करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. तर विधानमंडळाचे अधिवेशन संपण्याअगोदर आंध्रप्रदेश सरकारने केलेल्या 'दिशा' कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवीन कायदा करण्यात येणार आहे. या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी श्रीमती दोरजे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती, गृहमंत्री देशमुख यांनी दिली आहे.