मुंबई - दिशा सालियन मृत्यू प्रकरणी विधान परिषदेत मुद्दा उचलताच उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब चांगलेच संतापल्याचं दिसून आले. हे सभागृह कायद्यानुसार चालते, याचे दाखले देशात दिले जातात. परंतु इथं एकतर्फी कारभार चालल्याचं गेल्या काही दिवसात दिसून येते. घटनेनुसार सभापतींना काही अधिकार दिलेत. सभापतींनी न्यायाधीशाची भूमिका बजावायची असते. सभापतींच्या निर्णयाला हायकोर्टात चॅलेंज करता येत नाही. त्यामुळे कुठलेही निर्णय द्यायचे नसतात असं सांगत दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सभागृहात मांडलेल्या पाँईट ऑफ इन्फॉरमेशनवर अनिल परब यांनी भाष्य केले.
आमदार अनिल परब म्हणाले की, काही दिवसांपासून नियमबाह्य निर्णय सभापतींकडून दिले जात आहेत. केवळ तुमच्या निर्णयाला कोर्टात चॅलेंज करता येत नाही या छत्रीखाली हवेतसे निर्णय दिले जात आहेत. घटनेची पायमल्ली होतेय. मी वरिष्ठ वकिलांशी बोलून माझे मत मांडतोय. घटनेची मोडतोड कशी होते, त्याबद्दल मी बैठकीत बोलेन. सभागृहाचं कामकाज आपल्याकडे लेखी स्वरुपात येतो. त्यात बदल करण्याचा अधिकार सभापतींना असला तरी सभागृहाला विश्वासात घेऊन तो निर्णय घेतला जातो. पाँईट ऑफ इन्फॉरमेशनमध्ये जे जगाला माहिती नाही, बाहेर कुणाला माहिती नाही अशी माहिती सभागृहाला मांडली जाते असं त्यांनी सांगितले.
तसेच आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात ५ वर्ष चालू आहे. सीबीआय, सीआयडी चौकशी झाली. एसआयटी चौकशी झाली त्याचा रिपोर्ट सभागृहात का मांडला नाही. दीड वर्षात हा रिपोर्ट सादर केला नाही त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. शिळ्या कढीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला पडावेत म्हणून हे विषय आणले जातात का?, औरंगजेबाची कबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चेपून टाकली. आज दुसरा विषय नाही. आदित्य ठाकरेंची चौकशी करायला काहीच हरकत नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं मंत्री सांगतात. १७ फेब्रुवारीला अंतिम सुनावणी होती परंतु मुख्य न्यायाधीश नव्हते म्हणून तारीख पुढे ढकलली. कोर्ट जो काही निर्णय द्यायचा तो देईल. पाँईट ऑफ इन्फॉरमेशनमध्ये हा विषय मांडला जातो, त्याला परवानगी मिळते असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला.
सरड्यालाही लाज वाटली...
दरम्यान, ज्यांनी हा प्रस्ताव आणला त्यांचे एक ट्विट फक्त वाचून दाखवतो. सीबीआयने जेव्हा क्लीनचिट दिली तेव्हा मनीषा कायंदे यांनी ट्विट केले. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही. याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे. दिशा सालियनचा मृत्यू अपघाताने झाल्याचं सीबीआय रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले. परंतु भाजपा आणि राणे गँगने त्याचा थयथयाट केला. आरोप करणाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांची नाक घासून माफी मागावी असं म्हटलं. या मनीषा कायंदे त्यांनी सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला. सरड्यालाही लाज वाटली. आता उपसभापती खुर्ची डोळ्यासमोर दिसते. वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशाप्रकारचे आरोप करायचे असं सांगत अनिल परब कायंदे यांच्यावर संतापले.