Ajit Pawar on Disha Salian death Case: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूचे प्रकरण खूपच चर्चेत राहिले. पण त्याशिवाय आणखी एका प्रकरणाची चर्चा झाली ते म्हणजे त्याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूची. सीबीआयने नुकतेच निरीक्षण नोंदवले की दिशाचा मृत्यू हा अपघाती होता. तरीही आता हिवाळी अधिवेशनात भाजपा-शिंदे गटाने दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा मुद्दा चर्चेत आणत आदित्य ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी भाजपाचे नितेश राणे आणि शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मात्र, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र यावरून सत्ताधाऱ्यांना चांगलेच टोलवले.
"दिशा सालियन प्रकरण झाले त्यावेळी आम्ही सरकारमध्ये होतो. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे नेले. सीबीआयने तपास केला आणि तिने आत्महत्या केली असे त्या ठिकाणी सांगितले. त्यामध्ये कुणाचाही संबंध नाही. असे सीबीआयने स्पष्ट केले. जे प्रकरण संपले आहे तरी ते पुन्हा खुसपट काढून सभागृहाचा वेळ वाया घालवला जातो. आम्हाला या विषयी बोलायला दिले जात नाही. यांचा सीबीआयवर विश्वास नाही का? सरकार विरोधकांना घाबरले म्हणूनच दिशा सालियन प्रकरणाची ही नौटंकी सुरू झालीये", असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
"केंद्र सरकारच्या हातात सीबीआय आहे. मग त्यांनी चौकशी करून देखील जाणीवपूर्वक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम सुरू आहे. हे लोकशाहीला घातक आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विरोधक मुद्दा काढतील. प्रतिज्ञापत्र आल्यामुळे त्यांना उत्तर द्यायला जागा राहणार नाही. त्यामुळे ही नौटंकी चालली आहे", असा आरोपही अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.
नितेश राणेंनी केली AU ची कोंडी
२०२० पासून दिशा सालियान मृत्यू प्रकरण गाजत आहे. एका मुलीचा संशयास्पद मृत्यू होतो आणि त्याची चौकशी मुंबई पोलीस करतात. त्या चौकशीत दोनदा तपास अधिकारी बदलला जातो. ८ जूनच्या रात्री कोण कोण उपस्थित होता. कुणाच्या राजकीय दबावापोटी हे प्रकरण दडपण्यात आले. दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे नसून मुंबई पोलिसांकडे ही केस आहे. सीसीटीव्ही फुटेज का गायब करण्यात आले. ८ जूनच्या पार्टीत कोण होते? या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. त्या रात्री कुठला मंत्री होता? काहीतरी लपवण्यासाठी विरोधक गोंधळ घालतायेत का? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणेंनी उपस्थित केला.