मुंबई - दिशा सालियनचे वडील नुकतेच पोलीस आयुक्तांना भेटले. त्यांनी भेटीत घटनेबाबत विस्तृत माहिती दिली ती खूप गंभीर आहे. मालवणी पोलीस ठाण्यात याबाबत पुढील १-२ दिवसांत गुन्हा दाखल होईल. या गुन्ह्यात मुख्य आरोपी आदित्य ठाकरे, सुरज पांचोली, दिनो मोरिया आणि इतर आहेत. ८ जून २०२० ला दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. ती सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती. तिचा संशयास्पद मृत्यू झाला तेव्हा आदित्य ठाकरे मंत्री होते आणि त्यांचे वडील मुख्यमंत्री होते. दिशाच्या मृत्यूमागे आदित्यची काहीतरी भूमिका आहे असं समोर आलं होते. ८ जूनला रात्री दिशाचा मृत्यू झाला तेव्हा त्या पार्टीत हे सगळे तिकडे उपस्थित होते. मात्र हे प्रकरण तेव्हाच्या सरकारने दडपलं. मालवणी पोलिसांनी निष्पक्ष तपास केला नाही असं सांगत शिंदेसेनेचे नेते संजय निरूपम यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत.
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंविरुद्ध तक्रार; सामूहिक अत्याचार करून हत्येचा आरोप
आजच्या पत्रकार परिषदेत संजय निरूपम म्हणाले की, राज्य सरकारची एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी जो प्रश्न उपस्थित केला ते गंभीर आहे. दिशावर सामुहिक अत्याचार करण्यात आले. मुलीच्या मृत्यूनंतर ३ दिवसांनी पोस्टमोर्टम करण्यात आले. दिशाचा मृतदेह जिथं सापडला, ती जागा इमारतीपासून २५ फूट लांब आहे. तिच्या शरीरावर कुठल्याही जखमा नव्हत्या. ती नग्नावस्थेत होती असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. या प्रकरणात खूप मोठे लोक सहभागी होते तरीही याकडे फार लक्ष देण्यात आले नाही. त्यानंतर सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. सुशांतचे प्रकरण वेगळे आहे. आदित्य ठाकरेंवर सुप्रीम कोर्टात अर्ज देत माझी चौकशी झाली आहे. सीबीआयने मला क्लीनचिट दिली आहे असं सांगितले. परंतु दिशा सालियन मृत्यूची चौकशी सीबीआय करत नव्हती. दिशा प्रकरण मुंबई पोलिसांकडे आहे. त्यामुळे कोर्टाला खोटी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली असा आरोप त्यांनी केला.
दिशाच्या मृत्यूमागे ड्रग्ज रॅकेट?
तसेच दिशाच्या मृत्यूमागे ड्रग्ज रॅकेट समोर येते. त्यात समीर खान नावाचा व्यक्ती त्याला अटक झाली होती. आदित्य ठाकरेंना ड्रग्जची सवय आहे असं समीर खानने चौकशीत सांगितले आहे. ड्रग्ज पेडलरचे जो जबाब दिला आहे तो दिशाच्या मृत्यूमागे काय काय झाले त्याचा हा आधार होता. मालवणी पोलिसांनी याची चौकशी करायला हवी होती परंतु ते झाले नाही. मालवणीत जे तत्कालीन पोलीस होते, त्यांचीही चौकशी सुरू आहे. लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यावर गुन्हा दाखल होईल. या प्रकरणी आदित्य ठाकरेंना अटकही होऊ शकते. त्यानंतर आदित्य ठाकरेंचं नवीन नाव हत्यादित्य ठाकरे होईल. दिशाच्या हत्येत त्याचा सहभाग होता हे सिद्ध होईल असा दावाही संजय निरूपम यांनी केला आहे.
दरम्यान, कुणाल कामराचा व्हिडिओ आणून यांनी स्वत:वरील आरोपापासून वाचण्याचा प्रयत्न केला. विधानसभेत आमचे आमदार जे बोलले ते रेकॉर्डवर आहे. बीडमध्ये सरपंचाची हत्या झाली, त्या हत्येतील आरोपी वेगळे होते. परंतु आरोपींशी संबंध असल्याने विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. त्याच आधारावर जर आदित्य ठाकरे यांच्यावर एफआयआर दाखल झाला. हत्येत जर यांचे नाव आले तर नैतिकतेच्या आधारावर आदित्य ठाकरेंनी राजीनामा दिला पाहिजे. जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही तोवर त्यांनी पदापासून दूर राहिले पाहिजे अशी मागणी संजय निरूपम यांनी केली आहे.