मुंबई : दहीहंडीविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर गोविंदा प्रतिनिधींनी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नाराजी पसरलेल्या गोविंदांनी वेळोवेळी संताप व्यक्त केला. शिवाय, राजकीय नेत्यांच्या दारी जाऊन निर्णयात तडजोड करण्यासाठी भेटीगाठीही घेतल्या. मात्र, पदरी निराशा आल्यानंतर मंगळवारी गोविंदा प्रतिनिधींचा चमू दिल्लीला रवाना झाला. या प्रतिनिधींनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.गेल्या वर्षी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वाधिक थरांचा विक्रम करणाऱ्या जोगेश्वरीच्या जय जवान मंडळाने आपल्या विक्रमाचे प्रमाणपत्र राष्ट्रपतींना परत देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वाधिक मनोऱ्यांचा स्पेनचा २२ वर्षांचा विक्रम या मंडळाने गेल्या वर्षी मोडीत काढला होता. केवळ पुरस्कारवापसीच्या भूमिकेवर न थांबता, याचिका दाखल करण्यासाठी जय जवानचे पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी दिल्लीलाही रवाना झाले. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे सुरक्षेची सर्व काळजी घेऊ, असे आश्वासन जय जवान मंडळाने दिले आहे.>राज ठाकरे निर्णयावर ठाम, नऊ थरांचा ‘थरार’ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे केलेल्या वक्तव्यानंतर गोविंदा पथकांनी यांची भेट घेतली होती. मंगळवारी पुन्हा गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांची भेट घेऊन या निर्णयाविषयी चर्चा केली. या भेटीत राज यांनी आपली भूमिका कायम राखत उत्सव साजरा करण्यास पाठिंबा दर्शविला. याच धर्तीवर ठाणे येथे नऊ थरांच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केवळ हिंदूंच्याच सणाला नियमावली का? दुखापत होईल म्हणून आॅलिम्पिक रद्द करणार का, मग पारंपरिक दहिहंडीला नियमात का अडकवता? असे सवाल करत दहिहंडीवरुन न्यायालय आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
दहीहंडीविषयी पुनर्विचार याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2016 5:43 AM