लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : पुणे-सोलापूर महामार्गावरील प्रमुख बसस्थानक म्हणून इंदापूर बसस्थानकाचा उल्लेख होतो; मात्र मूलभूत सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष, तसेच स्वच्छतेअभावी बसस्थानकाची दुर्दशा झाली आहे. दिवसाढवळ्या तळीरामांचा अड्डा बसस्थानक परिसरात बसत असून, महिला; तसेच मुलींच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. इंदापूर शहरात सर्व सोयी-सुविधांनीयुक्त बसस्थानक बांधण्यात आले होते; मात्र सध्या या बसस्थानकाची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगली तर नाहीच; पण पुरुष व महिला स्वच्छतागृहाच्या मधोमध आहे. या तिन्ही ठिकाणी एकाच टाकीचे पाणी येते. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. पिण्याच्या पाण्याची टाकी कर्मचाऱ्यांच्या सवडीनुसार स्वच्छ करण्यात येत असते. मागील ४ महिन्यांपासून पाण्याची टाकी स्वच्छ केली नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सहा महिन्यांपूर्वी टाकीत मृतावस्थेत कुत्र्याचे पिल्लू आढळून आले असल्याचे दररोजच्या प्रवाशांनी सांगितले. ही सारी धक्कादायक परिस्थिती ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आली. बसस्थानकातील भिंतींना थुंकीबहाद्दरांनी लालेलाल केले आहे. आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी असलेले निवासस्थान सध्या तळीरामांचा अड्डा बनले आहे. दिवस-रात्र या ठिकाणी तळीरामांचा हैदोस सुरू असतो. एका कर्मचारी निवासाला कुलूप लावले आहे, तर दुसऱ्या निवासाचे अजूनही काम अपूर्ण आहे. कर्मचाऱ्यांना मुक्कामी थांबायचेच असेल, तर त्यांनी बसस्थानकापासून दीड किमी अंतरावर बसडेपोत यावे, असे इंदापूर आगाराने सांगितले आहे. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. इंदापूर बसस्थानकात महिलांच्या छेडछाडीच्या, हाणामारीच्या, चोरीच्या घटना राजरोस घडत आहेत. स्थानकातील पोलीस मदत केंद्र बंद करण्यात आले आहे. बसस्थानकाच्या आवारात खासगी गाड्या लावल्या जात असल्याने महामंडळाच्या ये-जा करणाऱ्या एसटीबसला अडथळा निर्माण होत आहे. बसस्थानकात बस आतमध्ये येणाऱ्या गेटवर एक भला मोठा चेंबर असून, तो मागील दहा दिवसांपासून उघडा आहे. दिवसेंदिवस स्थानकाच्या दुरवस्थेत भर पडत आहे. हे स्थानक स्वच्छ सुंदर करून द्यावे, अशी मागणी प्रवासीवर्गातून केली जात आहे.इंदापूर बस स्थानकास आगार व्यवस्थापक नाही. त्यामुळे इंदापूर आगाराचे नियोजन दिवसेंदिवस कोलमडत आहे. अतिरिक्तव्यवस्थापक बारामतीचे हनुमंत गोसावी यांनी सांगितले की, सर्व गोष्टींची दखल घेऊन लवकरात लवकर उपाय योजना केल्या जातील. प्रवाशांच्या सुरक्षेकडे व आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल. इंदापूर शहरातील बसस्थानक सद्य:स्थितीत मात्र अस्वच्छता, बेपर्वाई आणि अनास्थाच तिथे वास करताना दिसते. या परिसरात अनेक ठिकाणी विविध समस्या दिसून येत आहेत. त्याचा ‘लोकमत’ने पंचनामा केला. १) टॉयलेटशेजारीच पिण्याचे पाणी हे चित्र या स्थानकात दिसून आले. पुरुष आणि महिला शौचालये व त्याच्यामध्ये पिण्याचे पाणी. त्यातही सगळे नळ तुटलेले, एकच चालू. २) बसस्थानकात शोभेला असणारे कधीच सुरू नसणारे पंखे. ३) महामंडळ कर्मचाऱ्यांचे अस्वच्छ निवासस्थान. ४) निवासस्थानातच बसलेले तळीराम. ५) स्थानकातच बिनदिक्कत लावलेल्या गाड्या.
अस्वच्छतेचे आगार
By admin | Published: May 14, 2017 12:49 AM