पुणे : पुजारी हेच विश्वस्त असणे, वृद्धापकाळामुळे सध्याचे विश्वस्त कामास अयोग्य असणे आणि त्यामुळे गडावर अतिक्रमण, अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचे निरीक्षण नोंदवित धर्मादाय सह आयुक्त दिलीप देशमुख यांनी सोमवारी श्री खंडोबा देवतालिंग ट्रस्ट कडेपठार ट्रस्टचे सात जणांचे विश्वस्त मंडळ बरखास्त केले. तसेच संबंधित ट्रस्टची नवीन घटना तयार करुन, विश्वस्तांची निवड करावी असेही आदेशात म्हटले आहे. तो पर्यंत या ट्रस्टचे कामकाज पाहण्यासाठी पाच जणांच्या काळजीवाहू समितीची घोषणा धर्मादाय आयुक्तालयाने केली. ट्रस्टचे कामकाज पाहण्यासाठी सहायक धमार्दाय आयुक्त पुणे, नगराध्यक्ष जेजुरी, पोलीस उपनिरीक्षक जेजुरी, क्षेत्रिय वनअधिकारी जेजुरी , नायब तहसीलदार जेजुरी यांचा समावेश आहे. या पुर्वीचे पुण्याचे धर्र्मादाय आयुक्त शिवाजी कचरे आणि शिवकुमार डिगे यांनी देखील संबंधित विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा आदेश या पुर्वी दिला होता. मात्र या निर्णयाविरोधात विश्वस्तांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने संबंधित विश्वस्तांचे म्हणणे ऐकून घ्यावे, त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी असा आदेश दिला होता. त्या नुसार धर्मादाय सह आयुक्त देशमुख यांच्यासमोर या प्रकरणाची पुन्हा नव्याने सुनावणी झाली. या वेळी त्यांनी सात जणांचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.विश्वस्तांपैकी ५ जण वयोवृद्ध असल्याने ते काकाज करण्यास असमर्थ ठरतात. ते गडावर जाऊ शाकत नाहीत. तसेच एक विश्वस्त कायमस्वरुपी मुंबईस वास्तव्यास असून, एक जण कामकाज पहात नाही. त्यामुळे भाविकांना सोयी सुविधा देता येत नसल्याने गडावर अस्वच्छता पसरली आहे. अतिक्रमणांकडे देखील दुर्लक्ष होत आहे. या शिवाय पुजारी हेच विश्वस्त असल्याने हिशेबात गोंधळ झाला असल्याचे सिद्ध झाल्याने अखेर विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा अंतिम निर्णय धर्मादाय सह आयुक्तांनी दिला. सहायक धर्मादाय आयुक्त नव्याने श्री खंडोबा देवतालिंग ट्रस्टची घटना तयार करतील. त्यानुसार विश्वस्तांची निवड होईल. तो पर्यंत जाहीर केलेल्या पाच जणांच्या समितीच्या माध्यमातून कामकाज चालविले जाणार आहे.
खंडोबा ट्रस्टचे विश्वस्त मंडळ बरखास्त : धर्मादाय आयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2018 9:17 PM
वृद्धापकाळामुळे सध्याचे विश्वस्त कामास अयोग्य असणे आणि त्यामुळे गडावर अतिक्रमण, अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचे निरीक्षण नोंदवित श्री खंडोबा देवतालिंग ट्रस्ट कडेपठार ट्रस्टचे सात जणांचे विश्वस्त मंडळ बरखास्त केले
ठळक मुद्देपाच जणांच्या काळजीवाहू समितीची घोषणाधर्मादाय आयुक्त नव्याने श्री खंडोबा देवतालिंग ट्रस्टची घटना तयार पाच जणांच्या समितीच्या माध्यमातून कामकाज चालविले जाणार