केंद्रातील मोदी व उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा- नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 07:54 PM2021-10-04T19:54:12+5:302021-10-04T19:57:34+5:30
'शेतकऱ्यांना चिरडणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा अन्यथा महाराष्ट्र बंद करु'
मुंबई:देशातील शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचे धोरणच भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आखले असून शेतकरी संपवण्याचे पाप केले जात आहे. बसलेल्या शेतकऱ्यांना चिरडून टाकणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम योगी सरकार करत आहे. शेतकऱ्यांना चिरडून मारण्याची ही संतापजनक घटना तालिबानी प्रवृत्तीचे निदर्शक असून शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या भाजपाचे केंद्रातील मोदी सरकार व उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांचे सरकार बरखास्त करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकरी नरसंहाराच्या निषेधार्थ व शेतक-यांचे मारेकरी भाजप सरकारच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, किसान काँग्रेसचे श्याम पांडे, प्रदेश सचिव राजाराम देशमुख, झिशान अहमद आदी उपस्थित होते.
आंदोलनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, शेतकरी हा या देशाचा आधार आहे. अन्नदाता आहे, त्यालाच संपवण्याचे काम भाजप करत आहे. लखीमखेरी येथे झालेल्या घटनेतील दोषींवर तातडीने कारवाई झाली पाहिजे अन्यथा महाराष्ट्र बंद करु इशाराही पटोले यांनी दिला.
काँग्रेस नेत्या व सरचिटणीस प्रियंका गांधी लखीमखेरी येथील पीडित शेतकरी कुटुंबाला भेटण्यासठी जात असताना त्यांची अडवणूक केली, त्यांच्याशी पोलिसांनी गैरवर्तन केले आणि शेवटी बेकायदेशीर अटकही केली. या सर्व घटनांचा निषेध करुन प्रियंका गांधी यांना सोडा नाहीतर राज्यभर जेलभरो आंदोलन करु असेही पटोले म्हणाले. भाजपा सरकार सातत्याने शेतकऱ्यावर अन्याय करत असून महाराष्ट्रातही शेतकरी संकटात असताना मदत देण्यात दुजाभाव केला जात आहे. त्यावरही भाजपा राजकारण करत आहे. या सर्वांचा हिशोब भाजपाला द्यावा लागेल.
लखिमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना क्रूरपणे गाडीखाली चिरडणाऱ्या आधुनिक जनरल डायर योगी सरकारच्या निषेधार्थ सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथे आंदोलन करण्यात आले. तर जळगाव येथे प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले तसेच लातूर, सोलापूरसह राज्यभर सर्व जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी भाजपा व उत्तर प्रदेश सरकारविरोधात आंदोलन करुन निषेध करण्यात आला. यावेळी भाजपा व उत्तर प्रदेशातील अजयसिंह बिष्ट सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या बेकायदेशीर अटकेचा निषेधही करण्यात आला.