मायावती यांचे आदेश : पक्ष संघटनेची बांधणी नव्याने करणार नागपूर : महाराष्ट्रातील नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीला खातेसुद्धा उघडता आले नाही. तसेच अपेक्षेप्रमाणे मताधिक्याही मिळालेले नाही. बसपा सुप्रीमो खा. मायावती यांनी ही बाब अतिशय गंभीरपणे घेतली असून राज्यातील सर्व कमिट्या रद्द केल्या आहेत. तसेच राज्यातील पक्षाची संघटनात्मक बांधणी नव्याने करण्याचे आदेश बजावले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बसपाचा दारुण पराभव झाला. पक्षाचा गड असलेल्या उत्तर प्रदेशात एकही खासदार निवडून आणता आला नाही. त्यामुळे बसपाच्या राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. निवडणूक आयोगाने त्यासंबंधात नोटीसही बजावली होती. नोटीसला उत्तर देताना हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकांचे कारण सांगण्यात आले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपासून मायावती यांना बरीच अपेक्षा होती. यातही महाराष्ट्राकडे त्यांचे विशेष लक्ष लागले होते. महाराष्ट्रातील किमान २ आमदार किंवा ६ टक्के मतदान, असे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. या निवडणुकीमध्ये बसपाचे दोन आमदार निवडून येतील, अशी अपेक्षा होती. परंतु ते शक्य झाले नाही. उमेदवारांनी भरघोस मते घेतली. गेल्या निवडणुकीपेक्षा बसपाचे मतदान वाढले. महाराष्ट्रात ११ लाख ८८ हजार ५३३ इतके मतदान झाले. यापैकी विदर्भात ६ लाख ८७ हजार ७८३ मतदान झाले. परंतु यंदाही यश मात्र चाखता आले नाही. ही बाब मायावती यांनी अतिशय गांभीर्याने घेतली. मंगळवारी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी लखनौ येथे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत समीक्षा घेण्यासाठी प्रदेश प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीत खा. वीरसिंह, डॉ. सुरेश माने आणि विलास गरुड उपस्थित होते. महाराष्ट्रातील निवडणुकीतील परिणामाचा सविस्तर आढावा यावेळी सादर करण्यात आला. निवडणुकीमध्ये बसपा उमेदवार भरघोस मते घेतात, परंतु विजय मिळवू शकत नाही, यावर सविस्तर चिंतन झाले. ही बाब टाळण्यासाठी आणि महाराष्ट्रात यापुढे होणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्षाला १०० टक्के यश प्रप्त व्हावे, यासाठी पक्ष संघटना आणखी मजबूत करण्यावर मायावती यांनी जोर दिला. त्यानुसार राज्यातील सर्व कार्यकारिणीसह जिल्हा, विधानसभा, सेक्टर, बुथ व इतर सर्व कार्यकारिणी तात्काळ प्रभावाने बरखास्त करण्याचे निर्देश मायावती यांनी दिले. (प्रतिनिधी)डॉ. सुरेश माने महाराष्ट्र प्रभारी विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. सुरेश माने यांच्याकडे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी होती. परंतु मायावती यांनी त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी सोपविली आहे. महाराष्ट्रात आता बसपाचे डॉ. माने आणि खा. वीरसिंह हे दोघेही प्रभारी म्हणून काम पाहतील. विलास गरुड आणि कृष्णा बेले यांचे पद कायम मायावती यांनी महाराष्ट्रातील बसपाच्या सर्व कमिट्या रद्द करण्याचे आदेश दिले असले तरी प्रदेशाध्यक्ष विलास गरुड आणि प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले यांचे पद मात्र कायम राहणार आहे.आगामी तीन महिन्यात संघटनेचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. आगामी संघटन प्रक्रिया, संघटन प्रशिक्षण, बसपा सदस्यता यासाठी विभागवार बैठक घेऊन त्यांना संघटनात्मक कार्यक्रम देण्यात येणार आहे, असे बसपाचे प्रदेश प्रभारी खा. अॅड. वीरसिंह यांनी म्हटले आहे.
बसपाच्या राज्यातील सर्व कमिट्या बरखास्त
By admin | Published: October 23, 2014 12:27 AM