कोल्हापूर - हातकंणगले मतदारसंघावरून शिवसेनाउद्धव ठाकरे गटात नाराजी उफाळून आली आहे. अलीकडेच माजी खासदार राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर या भेटीवर कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी आक्षेप घेतला. शेट्टींचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. त्यांना उमेदवारी देऊ नका असं त्यांनी थेट म्हटलं. त्यावर उद्धव ठाकरेंनी जाधव यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यावर आता ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी मुरलीधर जाधवांना चुकीचा निर्णय घेऊ नका असं आवाहन केले आहे.
उपनेते संजय पवार म्हणाले की, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधवांना कमी करून नवीन २ जणांनी नियुक्ती केली आहे. जिल्हाप्रमुख पदावर नेमणूक आणि कमी करणे हा अधिकार मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आहे. १८-१९ वर्ष मुरलीधर जाधवांनी शिवसेनेत काम केले. चांगले केले हे सर्व ठीक आहे. परंतु आता अशी वेळ आहे की आपण पक्षाला काहीतरी दिले पाहिजे. मातोश्रीवर कुणी जायचे, भेटायचे हा अधिकार कुठल्याही शिवसैनिकाचा अथवा पदाधिकाऱ्याचा नसतो. तो अधिकार उद्धव ठाकरेंचा असतो असं त्यांनी सांगितले.
तसेच मुरलीधर जाधव यांचा गैरसमज झाला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नका. पक्षासोबत राहा. पक्षाने आपल्याला भरपूर दिलेले आहे. भविष्यातही प्रत्येक शिवसैनिकांची कदर करणारे उद्धव ठाकरे आहेत. तुम्ही त्यांचा विचार करा. त्यांच्या पाठिशी तुम्ही ठाम राहा. हा जो काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय उद्धव ठाकरेंनी का घेतला, कशासाठी घेतला याचा विचार आपण करायचा नसतो. Boss is always right महाराष्ट्राच्या भल्यासाठी, शिवसेनेच्या भल्यासाठी उद्धव ठाकरे निर्णय घेतात आणि घेत राहतील याची मला खात्री आहे असं सांगत संजय पवार यांनी मुरलीधर जाधवांना आवाहन केले आहे.
काय म्हणाले मुरलीधर जाधव?
२०१४ ला महायुतीच्या माध्यमातून याच राजू शेट्टींना सर्व शिवसैनिकांनी स्वतःच्या खिशातले पैसे घालून, स्वतःचे डिझेल घालून निवडून आणले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत युती तुटली आणि हेच शेट्टी भाजपात जाऊन बसले, असा आरोप जाधव यांनी केला होता. राजू शेट्टींनी ठाकरेंसोबत गद्दारी केली होती असं जाधव यांनी म्हटलं. तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शेट्टींना उमेदवारी देऊ नका, माझ्यासारख्या निष्ठावंतांची या ठिकाणी इच्छा आहे की मी तिथे लढले पाहिजे. पाच वर्षे शहर प्रमुख, तीन वर्ष तालुकाप्रमुख, १९ वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून काम करतोय. २००५ मध्ये पक्ष फुटला तेव्हा तुमच्यासोबत राहिलो. आताही तुमच्यासोबत राहिलो. अशा कार्यकर्त्याला जर संधी न मिळता राजू शेट्टींसारखा कुणीतरी आयत्या बिळात नागोबा होण्यासाठी येणार असेल तर जनता त्याचा नक्की विचार करेल असा इशारा जाधव यांनी दिला होता.