काँग्रेसमध्ये कंप : थोरातांचा नाराजीनामा; पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल, पाटील तातडीने दिल्लीत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 06:45 AM2023-02-08T06:45:27+5:302023-02-08T06:47:03+5:30

महाराष्ट्र काँग्रेसमधील वादाची दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली असून, प्रभारी एच.के. पाटील यांना तातडीने दिल्लीत पाचारण केले.

Displeasure of Thorats; Serious notice from party leaders, Patil immediately in Delhi | काँग्रेसमध्ये कंप : थोरातांचा नाराजीनामा; पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल, पाटील तातडीने दिल्लीत

काँग्रेसमध्ये कंप : थोरातांचा नाराजीनामा; पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल, पाटील तातडीने दिल्लीत

googlenewsNext

नवी दिल्ली/मुंबई : विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या उमेदवारी घोळावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या संघर्षाने टोक गाठले आहे. या निवडणुकीत झालेला पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर येत असून, त्यातूनच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे राज्य प्रभारी एच.के. पाटील यांना पाठविलेल्या पत्रात विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबरोबर काम करणे शक्य नसल्याचेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. 

महाराष्ट्र काँग्रेसमधील वादाची दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली असून, प्रभारी एच.के. पाटील यांना तातडीने दिल्लीत पाचारण केले. पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन पक्षातील अंतर्गत घडामोडींची माहिती दिली. पाटील यांनी काँग्रेस अध्यक्षांसह काँग्रेस संघटन महासचिव के.सी. वेणुगोपाल यांचीही भेट घेतली.

मध्यम मार्ग काढण्याचा आपला प्रयत्न राहील : पाटील
काँग्रेसमध्ये असलेल्या मतभेदाची आपल्याला कल्पना असून, यातून मार्ग काढण्यात येईल, असा विश्वास एच.के. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार वेळ पडल्यास मुंबईत जाऊन काँग्रेसच्या विविध नेत्यांशी चर्चा करू. यातून मध्यम मार्ग काढण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही पाटील यांनी सांगितले. मात्र, नाना पटोले यांना पदावरून हटविण्याच्या संदर्भात मात्र त्यांनी स्पष्ट काहीही वक्तव्य केले नाही. काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याच महिन्यात छत्तीसगडमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी राज्याच्या राजकारणात काहीही विशेष घडण्याची शक्यता नाही.

मी माझ्या भावना मांडल्या 
काँग्रेसमध्ये जे राजकारण झाले त्याबाबत पक्षश्रेष्ठींकडे मी माझ्या भावना मांडल्या आहेत. याबाबत मला अधिक काहीही बोलायचे नाही. 
- बाळासाहेब थोरात 

राजीनाम्याचे पत्र असेल तर दाखवा. बाळासाहेब आमच्यासोबत बोलतच नाहीत, त्यांची तब्येत चांगली नाही. माझा त्यांच्याशी संपर्क नाही. काल कसब्यातील अर्ज भरतानाही सगळे नेते आले होते, थोरातांनी यावे, अशी आमची अपेक्षा होती. हे राजकारण आहे, याकडे लक्ष देण्याची गरज नाही. जनतेकडे, त्यांच्या कामाकडे आम्ही लक्ष देत आहोत.
- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.

मी सकाळी बाळासाहेब थोरात  
यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  तेव्हा मला याची कल्पना नव्हती. पक्ष मजबूत होण्यासाठी जेजे शक्य आहे, ते मी करणार
आहे. दुर्दैवी बाब आहे, बाळासाहेब आमचे सहकारी आहेत, ते काँग्रेसचे ज्येष्ठ आणि संयमी नेते आहेत. यामागचे कारण काय, हे समजल्याशिवाय प्रतिक्रिया देणे उचित नाही. 
- अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री

आत्मपरीक्षण व्हावे!
माझा त्यांच्याशी संपर्क झालेला नाही, त्यांनी राजीनामा दिल्याची मला माहिती नाही. खरेच असे झाले असेल, तर काँग्रेसबरोबर एवढी वर्षे राहिलेले लोक असे का करत आहेत, याचे  काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे यांनी सांगितले. तर अजित पवार म्हणाले, मी बाळासाहेबांना राजीनाम्याबद्दल विचारले. मी राजीनामा दिलेला आहे, तो माझा पक्षांतर्गत प्रश्न आहे. मी माझ्या पक्षातील वरिष्ठांशी बोलून पुढची भूमिका ठरविणार आहे, असे त्यांनी मला सांगितले.


 

Web Title: Displeasure of Thorats; Serious notice from party leaders, Patil immediately in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.