मुंबई - विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर जागांसाठी निवडणूक पार पडतेय. मात्र याच निवडणुकीवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात वाद निर्माण झाला आहे. विधान परिषदेच्या सर्व जागांवर उद्धव ठाकरेंनी उमेदवार जाहीर केले. त्यावरून काँग्रेस नेते प्रचंड नाराज आहेत. नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मागे घ्यावी अशी काँग्रेसनं ठाकरेंकडे मागणी केली आहे.
याबाबत नाना पटोले म्हणाले की, ज्यावेळी उद्धव ठाकरे लंडनमध्ये गेले, तेव्हा फोनवरून संवाद झाला. २ जागा तुम्ही लढा आणि २ जागा आम्ही लढतो असं म्हटलं. त्यांनी मला तुमचे उमेदवार कोण असं विचारले त्यावर उमेदवारांची नावे सांगितली. नाशिकमधले जे उमेदवार होते. त्यांना ठाकरेंनी बोलावून घेतले आणि उभे केले. चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित आहे. महाविकास आघाडीत चर्चा करून निर्णय घेतला असता तर या चारही जागा आम्हाला जिंकणे सोप्पे झाले असते असं त्यांनी सांगितले.
तसेच ठाकरेंनी चारही जागा घोषित केल्या आहेत. मी सकाळपासून त्यांना फोन लावतोय, पण त्यांचे ऑपरेटर साहेब तयार होतायेत असा निरोप देत होते. माझ्याशी त्यांचा फोनवर संपर्क झाला नाही. ठाकरेंच्या मनात नेमके काय हे भेटल्यावर कळेल. आम्ही मुंबईत उमेदवार दिले नाहीत. त्यांचा मुंबईत रस असतो हे आम्हाला माहिती आहे. परंतु परस्पर त्यांनी उमेदवार जाहीर केले आहेत. आपण सर्वांनी महाविकास आघाडीत लढलं पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं.
सांगलीच्या जागेवरून वादंग
लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात वादंग निर्माण झालं होतं. सांगलीत उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली होती. मात्र याठिकाणी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी कडाडून विरोध केला. मात्र ठाकरेंनी उमेदवार मागे घेण्यास नकार दिल्याने येथील काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणुकीत अर्ज भरला. निकालात अपक्ष विशाल पाटील यांनी बाजी मारली. याठिकाणी ठाकरेंनी दिलेल्या उमेदवाराचे डिपॉझिटही जप्त झाले. त्यातच निवडणुकीच्या निकालानंतर विशाल पाटील यांनी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिला. काँग्रेसनेही विशाल पाटलांचे कौतुक केले. मात्र या राजकीय खेळीमुळे ठाकरेंच्या उमेदवारावर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की सहन करावी लागली. त्यामुळे सांगलीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यात वादाची ठिणगी पेटली आहे.