Maharashtra Political Crisis: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील सत्तासंघर्ष अधिकाधिक तीव्र होताना पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी टिकणार की फुटणार यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. यातच आता काँग्रेसमधील काही नेत्यांची खदखद वाढल्याचे सांगितले जात असून, असंतुष्ट नेते थेट राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. एवढेच नव्हे तर, ते अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेटही घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
प्रदेश प्रतिनिधींच्या निवडीवरून काँग्रेस असंतुष्टांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांना भेटण्याची तयारी त्यांनी केली असून, वेळप्रसंगी पदाधिकारीपदाचा राजीनामा देण्याचा निर्धार केला आहे. प्रदेश काँग्रेसच्या प्रतिनिधींची संकेतस्थळावरील एक यादी व्हायरल झाली. नागपुरातील यादी बाहेर येण्यापूर्वीच नावांवर वाद सुरू झाला. यानंतर असंतुष्टांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यानंतर या गटाची दीड तास आमदार निवासात बैठक झाली.
शहरातील प्रमुख नेत्यांची नावे नाहीत
शहरातील प्रमुख नेत्यांची नावे नसल्याने पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात येणार आहे. कोणत्याही निवडणूक प्रक्रियेविना प्रदेश प्रतिनिधींची निवड लोकशाही विरोधी व निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय करणारी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. एकाच घरातून दोन सदस्य प्रदेशवर पाठवले. निष्ठावान, ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना डावलून पक्षात अलीकडे सक्रिय झालेल्यांना संधी दिल्याचा रोष व्यक्त करण्यात आला. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना दिल्लीत वेळ घेऊन भेटण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
पक्षाकडून प्रतिसाद न मिळाल्यास राजीनामा
पक्षाकडून प्रतिसाद न मिळाल्यास राजीनामा देण्याबाबतही चर्चा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अर्थात सोनिया गांधी यांच्यासंदर्भात काय घडामोडी होतात, त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आशीर्वादाने शहरातील काही नेते पक्ष संपवण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोपही करण्यात आला.