मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 06:29 AM2024-10-19T06:29:35+5:302024-10-19T06:31:43+5:30
वाद सुरू असतानाच शरद पवारांनी शुक्रवारी काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी जागा वाटपावर फोनवरून चर्चा केल्याचे समजते. येत्या एक ते दोन दिवसात जागा वाटप पूर्ण करण्याबाबत यावेळी चर्चा झाल्याचे समजते.
जागा वाटप अंतिम टप्प्यात आले असताना महाविकास आघाडीतीलकाँग्रेस व उद्धवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. राज्यातील काँग्रेसचे नेते जागा वाटपाबाबत निर्णय घेण्यास सक्षम नसल्याचे विधान उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीची भावना आहे. त्यातही राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केल्याने मविआतील जागा वाटपाची चर्चा गुरुवारी जिथे संपली होती तिथेच थांबली आहे. तुटेपर्यंत ताणू नका, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. दोन दिवसात जागा वाटप संपू शकते, एवढ्या अंतिम टप्प्यात आले आहे, असेही ते म्हणाले. वाद सुरू असतानाच शरद पवारांनी शुक्रवारी काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी जागा वाटपावर फोनवरून चर्चा केल्याचे समजते. येत्या एक ते दोन दिवसात जागा वाटप पूर्ण करण्याबाबत यावेळी चर्चा झाल्याचे समजते.
नेमका काय वाद?
राऊत म्हणाले, राज्यातील काँग्रेसचे नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत मविआतील जागावाटप थांबले आहे, त्याला गती मिळाली पाहिजे, असे सांगताना याबाबत आपण काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांच्याशी चर्चा केली असून लवकरच राहुल गांधींनाही भेटणार आहे. राज्यातील काँग्रेसचे नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत असे मला वाटते. त्यांना वारंवार दिल्लीला यादी पाठवावी लागते. त्यामुळे काही जागांवर फैसला होत नाही. आता वेळ कमी आहे, असे विधान करून संजय राऊत यांनी जागा वाटपाच्या विलंबाला राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दोष दिला आहे.
पटोले म्हणाले, राऊत यांच्याबाबत आम्हाला काही बोलायचे नाही मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जागा वाटपाची समिती स्थापन झाली आहे. या समितीच्या बैठकीत जी चर्चा झाली त्याची माहिती पक्षश्रेष्ठींना देणे ही आपली जबाबदारी आहे. संजय राऊत उद्धव ठाकरेंना टाळत असतील तर तो त्यांचा विषय आहे. त्याबाबत आम्हाला माहीत नाही. संजय राऊत यांनी काय करावे तो आमचा प्रश्न नाही. राऊत यांच्याबाबत आम्हाला काही बोलायचे नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
जागांच्या बाबतीत खेचाखेची होतेच... अनेक पक्ष एकत्र निवडणूक लढवतात, तेव्हा जागांची खेचाखेची होते. पण ती तुटेपर्यंत ताणायची नाही हे लक्षात ठेवायला हवे. फार मोठा तंटा बखेडा झालेला आहे, असे माझ्या कानावर आलेले नाही. येईल तेव्हा भाष्य करेन. - उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री
उरलेल्या जागांवर तीनही पक्षांचे पक्षश्रेष्ठी सामंजस्याने निर्णय घेतील. ते त्यांच्या पक्षाची बाजू मांडतात, आमचे नेते आमच्या पक्षाची बाजू मांडतात, दोन्ही बाजू ऐकून पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. - अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद पक्षांचा वाद नाही हा दोन नेत्यांमधील वाद आहे. दोन नेत्यांमध्ये कधी खटका उडत असतो. - जितेंद्र आव्हाड, नेते, शरद पवार गट