लोकमत न्यूज नेटवर्कघोडेगाव : मंचर भीमाशंकर रस्त्यावर झालेल्या खुनाचा २४ तासांत छडा लावण्यात घोडेगाव पोलिसांना यश आले आहे. बहिणीच्या आत्महत्येचा राग मनात ठेवून सोमनाथ दगडू एरंडे (वय ४०) याचा त्याचाच मेहुणा हनुमंत श्रीराम बारवे याने छातीत व डोक्यात दगड घालून खून केला. हनुमंत बारवे असे आरोपीचे नाव आहे. घोडेगावजवळ अजित काळे यांच्या शेतात रविवारी (दि. २८) दुपारी मृतदेह आढळून आला. या मृतदेहाची पाहणी पोलिसांनी केली असता हा खुनाचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मृताजवळ मिळालेल्या वस्तूंवरून पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. मृताच्या नातेवाइकांचा शोध घेऊन बोलावले असता मृतदेह सोमनाथ दगडू एरंडे (रा. थुगाव) याचा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कसून तपास केला असता मेहुण्यानेच खून केला असल्याचे उघड झाले. आरोपी हनुमंत बारवे याची बहीण काजल हिने जानेवारी महिन्यात राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही आत्महत्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळून केली होती. यावरून मृत सोमनाथ एरंडे याच्यावर मंचर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हादेखील दाखल झाला आहे. हा राग हनुमंत बारवे याच्या मनात होता. त्याने सोमनाथ एरंडे याला घोडेगाव येथे गोड बोलून आणले, मंचर-भीमाशंकर रस्त्यावर आंब्याच्या झाडाखाली दोघे एकत्र दारू प्यायले. त्यात हनुमंत बारवे याने डाव साधून सोमनाथ एरंडे याच्यावर दगडाने डोक्यावर, छातीवर घाव घालून खून केला. घटनेची माहिती मिळताच घोडेगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली. या वेळी मिळालेल्या पुराव्यांवरून तत्काळ मृतदेहाची ओळख पटविण्यास घोडेगाव पोलिसांना यश आले. मृताच्या नातेवाइकांकडे चौकशी केली असता त्यांना आरोपी हनुमंत बारवे यावर संशय आला. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. घोडेगाव पोलिसांनी तत्परता दाखवत २४ तासांत गुन्ह्याचा तपास लावला व आरोपीला अटक केली. यामध्ये घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर, पोलीस फौजदार एस. वाय. भोजने, एम. बी. सरोदे, व्ही. एन. साबळे, एस. सी. भोईर, एस. एम. लांडे, सायली काळंगे आदींनी तपासात सहभाग घेतला.
मंचरजवळील खुनाचा २४ तासांच्या आत उलगडा
By admin | Published: May 31, 2017 1:23 AM