अकोला : थकीत पाणीपट्टीमुळे २१ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने दहीहांडा व हिंगणी परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी अकोल्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (मजीप्रा) कार्यकारी अभियंता कार्यालयात बुधवारी तोडफोड केली. तोडफोड करणाऱ्यांपैकी काही जणांना सिव्हिल लाइन्स पोलिसांनी ताब्यात घेतले.८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या गावांच्या ग्रामपंचायतींकडे ९ कोटींची पाणीपट्टी थकीत आहे. त्यामध्ये सर्वाधिक पाणीपट्टी थकीत असलेल्या दहीहांडा व हिंगणीसह २१ गावांचा पाणीपुरवठा आठ दिवसांपासून मजीप्रामार्फत बंद करण्यात आला आहे. अगोदच पाणीटंचाई असल्याने पाणीपुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी गोपाल दातकर यांच्यासह दहीहांडा व हिंगणी येथील १४ ते १५ ग्रामस्थ बुधवारी दुपारी अकोल्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात आले. प्रभारी कार्यकारी अभियंता संजय चौधरी अमरावती येथे बैठकीसाठी गेले होते. संतापलेल्या ग्रामस्थांनी कार्यालयाच्या तांत्रिक शाखेतील खुर्चा, टेबल व काचांची तोडफोड केली. या वेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्कीही करून कार्यालयाबाहेर काढून अभ्यागत कक्ष आणि यांत्रिकी शाखेच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकण्यात आले. (प्रतिनिधी)
अकोल्यातील ‘मजीप्रा’ कार्यालयाची तोडफोड
By admin | Published: January 14, 2016 2:16 AM