मुंबई : काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून ट्विटरवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संस्थेच्या 'नमत्से सदा वत्सेले' या प्रार्थनेत हिंदू राष्ट्राचा उल्लेख आहे, जो पूर्णपणे असंविधानिक आहे, असा आक्षेप घेत सचिन सावंत यांनी कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे सोमय्या यांच्याकडून आता सावंत यांना प्रतिउत्तर देण्यात आले आहे.
सचिन सावंत यांनी गुरुवारी ट्वीट करत, राष्ट्रीय स्वयंसेवक संस्थेच्या 'नमत्से सदा वत्सेले' या प्रार्थनेत हिंदू राष्ट्राचा उल्लेख केला गेला असून, जो पूर्णपणे असंविधानिक असल्याचा आरोप केला होता. तर या प्रकरणी किरीट सोमय्या यांच्यासह आरएसएस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणी सुद्धा सावंत यांनी केली होती.
त्यांच्या या ट्वीटला उत्तर देत सोमय्या म्हणाले की, 'काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी 'नमत्से सदा वत्सेले' प्रार्थना म्हणणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर आणि माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही हजर व्हायचे हे गृहमंत्री अनिल देशमुख आणि सावंत यांनी सांगावं, तसेच त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी गुन्हे दाखल करावे' असं आव्हानच भाजपच्या किरीट सोमय्या यांनी दिलं आहे.