शरद पवार गटाच्या 'या' १० आमदारांविरोधात अपात्र याचिका; अजित पवार गटानं दिलं पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 06:16 AM2023-09-23T06:16:27+5:302023-09-23T06:16:49+5:30
शरद पवारांच्या गटातील आमदारांना अपात्र करा, अजित पवार गटाचे विधानसभा अध्यक्षांना पत्र
मुंबई - अजित पवार गटाने शरद पवार गटातील आमदारांना तत्काळ अपात्र करावे अशी मागणी करणारे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहे. अजित पवार यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ९ जणांची आमदारकी रद्द करावी, यासाठी शरद पवार गटाने पत्र दिले होते. आता अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी हे पत्र दिले असून संबंधितांवर पक्षविरोधी कृती केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या आमदारांविराेधात मागणी
जयंत पाटील (इस्लामपूर), जितेंद्र आव्हाड (मुंब्रा- कळवा), अनिल देशमुख (काटोल), बाळासाहेब पाटील (उत्तर कराड), राजेश टोपे (घनसावंगी), प्राजक्त तनपुरे (राहुरी), रोहित पवार (कर्जत जामखेड), सुमन पाटील (तासगाव कवठेमहांकाळ), सुनील भुसारा (विक्रमगड), संदीप क्षीरसागर (बीड)
संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे
पक्षफुटीनंतर अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेणार नसल्याचे निश्चित केले होते. पक्षातील बहुतांश आमदार आणि नेत्यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिला होता. मात्र, शरद पवार यांनी अजित पवार समर्थक मंत्री आणि आमदारांच्या मतदारसंघात सभा घेऊन आव्हान दिल्यामुळे अजित पवार समर्थक नाराज झाले आहेत. या सभांनाही प्रत्युत्तर देण्यासाठी उत्तरदायी सभा घेतल्या जात आहेत. आता या पत्रामुळे हा संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. ‘राष्ट्रवादी’मध्ये फूट पडल्यानंतर आमचाच खरा पक्ष असल्याचा दावा दोन्ही गटांनी केला आहे.
याप्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे. शरद पवार गटाने अपात्रतेची प्रक्रिया सुरू केल्याने आम्हालाही हे पाऊल उचलावे लागले. - संजय तटकरे, प्रवक्ते, अजित पवार गट
मुळात अनिल पाटील प्रतोद नाहीतच. राजकीय पक्षाने प्रतोद नियुक्त करायचा असतो असा शिवसेना प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. त्यामुळे अनिल पाटील यांनी दिलेले पत्रच बेकायदेशीर आहे. - जितेंद्र आव्हाड, नेते, शरद पवार गट