अपात्रतेच्या याचिकांवर विधासभा अध्यक्षांसमोर सुनावणी, ठाकरे गटाच्या त्या युक्तिवादावर राहुल नार्वेकर संतापले, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 09:10 PM2023-10-26T21:10:43+5:302023-10-26T21:11:31+5:30
Rahul Narvekar : सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष हे शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे सुरू असलेल्या सुनावणीकडे लागलं आहे.
सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष हे शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे सुरू असलेल्या सुनावणीकडे लागलं आहे. आज विधानसभा अध्यक्षांनी मागील सुनावणीत घेतलेल्या निर्णयाप्रमाणे ३६ याचिकांची ६ गटांत विभागणी करून एकत्र सुनावणीला सुरुवात केली. यावेळी झालेल्या युक्तिवादवेळी शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या सुनवणीदरम्यान, मी सर्वोच्च न्यायालयाचं ऐकायचं की, स्वत: निर्णय घ्यायचा, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाच्या वकिलांना सुनावलं.
दरम्यान, आज झालेल्या सुनावणीवेळी शिंदे गटाच्या वकिलांनी विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेच्या याचिकांवर पुरावे सादर करण्यासाठी आणखी १४ दिवसांची मुदत वाढवून मागितली. मात्र या शिंदे गटाच्या वकिलांनी केलेल्या या मागणीला ठाकरे गटाच्या वकिलांकडून आक्षेप घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आणखी पुरावे सादर करण्याची गरज नसल्याचा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला. तर हा ठाकरे गटाचा युक्तिवाद आहे, आम्हाला आणखी काही पुरावे सादर करण्याची गरज असल्याचं वाटतं, असं शिंदे गटाने सांगितले.
यादरम्यान, ठाकरे गटाच्या वकिलांनी विधानसभा अध्यक्षांना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला मर्यादा आखून दिलेली आहे. त्याच चौकटीत तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे सर्व पुरावे पाहण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. ठाकरे गटाच्या या दाव्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर संतापले. मी सर्वोच्च न्यायालयाचं ऐकू की स्वत: निर्णय घेऊ, असा संतप्त सवाल त्यांनी ठाकरे गटाच्या वकिलांना विचारला.