अकोले (जि. अहमदनगर) : आम्ही सरकारचे मित्रपक्ष किंवा घटकपक्ष नव्हतो. फक्त निवडणुकीत आम्ही काही काळ त्यांच्यासोबत होतो. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार शेतकऱ्यांना न्याय देईल, असे वाटत होते. मात्र, नव्या सरकारने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केला, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी केला. सरकारला शेतकऱ्यांकडून जमिनी हिसकावून घेऊन ‘लँड माफियांच्या’ घशात घालायच्या आहेत, असेही ते शाहू-फुले-आंबेडकर व्याख्यानमालेनिमित्त येथे असताना पत्रकारांशी बोलताना म्हणाले. शेट्टी यांनी भाजपा सरकारविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत रस्त्यावरची लढाई करण्यास स्वाभिमानी संघटना कटिबद्ध आहे. स्वामिनाथन समितीच्या शिफारसीनुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट शेतीमालाला भाव मिळणे अपेक्षित होते. मात्र भाव देणे दूरच, त्यांच्या जमिनीवरच सरकार डोळा ठेवून आहे. उद्योजकांना शेतकऱ्यांच्या जमिनी मातीमोल किमतीत लाटायच्या आहेत. सेझच्या नावाने घेतलेल्या काही जमिनींचा वापरच झालेला नाही. पूर्वी अधिग्रहित केलेल्या जमिनींच्या संदर्भात सरकारने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणीही त्यांनी केली. (प्रतिनिधी)
सरकारकडून शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग
By admin | Published: April 16, 2015 2:00 AM