शरद पवारांविषयी असंतोष, पक्षात नियुक्त्या झाल्या, निवडणुका नाहीत!, अजित पवार गटाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 12:46 PM2024-01-30T12:46:27+5:302024-01-30T12:47:16+5:30

Sharad Pawar: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आपल्या मनात असंतोष होता. राष्ट्रवादीत केवळ नियुक्त्या होत होत्या, मात्र निवडणूक कधी झाली असे वाटले नाही. षण्मुखानंद हॉल येथे २१ जून रोजी झालेल्या बैठकीनंतर पक्षात अस्वस्थता होती.

Dissatisfaction with Sharad Pawar, party appointments, no elections!, Ajit Pawar group claims | शरद पवारांविषयी असंतोष, पक्षात नियुक्त्या झाल्या, निवडणुका नाहीत!, अजित पवार गटाचा दावा

शरद पवारांविषयी असंतोष, पक्षात नियुक्त्या झाल्या, निवडणुका नाहीत!, अजित पवार गटाचा दावा

मुंबई -  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आपल्या मनात असंतोष होता. राष्ट्रवादीत केवळ नियुक्त्या होत होत्या, मात्र निवडणूक कधी झाली असे वाटले नाही. षण्मुखानंद हॉल येथे २१ जून रोजी झालेल्या बैठकीनंतर पक्षात अस्वस्थता होती. या बैठकीनंतर सर्व नेते व कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचा दावा अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी सोमवारी झालेल्या  सुनावणीत केला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरू आहे. यात अनिल पाटील यांची उलटतपासणी झाली. त्यांना अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय, पक्षाअंतर्गत निवडणुका, जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद आदींबाबत शरद पवार गटाचे वकील शरण जगतियानी यांनी प्रश्न विचारले.    
एबी फॉर्मवर प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटलांची सही २०१९च्या निवडणुकीच्या एबी फॉर्मवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची स्वाक्षरी होती हे अनिल पाटील यांनी मान्य केले. 

...म्हणून केले तसे विधान 
आपल्या मनात शरद पवार यांच्या विरोधात असंतोष होता तर मग पवार यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडू नये किंवा राजीनामा देऊ नये असे मत माध्यमात आपल्याकडून का व्यक्त करण्यात आले, असा सवाल वकिलांनी अनिल पाटील यांना केला. तेव्हा पार्टी एकसंघ राहिली पाहिजे यासाठी राज्यातील नेत्यांच्यासोबत आम्ही सातत्याने चर्चा करायचो. असंतोष कमी होण्याच्या दृष्टीने, लोकांमध्ये पक्षाची इमेज खराब नको व्हायला म्हणून असे विधान केले होते, असे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले.  

२०१८ साली निवड नाही तर घोषणा
शरद पवार यांनी राजीनामा देऊ नये म्हणून आपण दिलेले पत्र मीडियावर व्हायरल झाले होते, असा सवाल केला असता आपल्याला आठवत नसल्याचे अनिल पाटील म्हणाले. २१ जून रोजी सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या बाजूने केलेले भाषणही आपल्याला आठवत नसल्याचे ते म्हणाले. शरद पवार हे १९९९ पासून राष्ट्रीय अध्यक्ष होते. मात्र २०१८ साली राष्ट्रीय कार्यकारिणीत शरद पवार यांच्या नावाची घोषणा झाली, पण निवडणूक झाली नसल्याचे त्यांनी नमूद केले.  

Web Title: Dissatisfaction with Sharad Pawar, party appointments, no elections!, Ajit Pawar group claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.