ऑनलाइन लोकमत
दिंडोरी (नाशिक), दि. २६ - नाशिक कळवण रस्त्यावरील अवनखेड येथील नवीन पूल तीन महिन्यापूर्वी वाहतुकीसाठी खुला झाला असतानाच सदर पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने पावसाने रस्ता खराब होत मोठमोठी खड्डे पडले आहे. या खड्डयामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे मात्र त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्णता दुर्लक्ष केले केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अवनखेड येथील पूर्वीच्या अरुंद पुलावर अनेक वेळा अपघात होत अनेकांना जीव गमवावा लागला होता त्यानंतर येथे नवीन पूल करण्याची मागणी केली होती मात्र रस्ता मागे खाजगीकरणातून झाला परंतु त्यातून पूल वगळला गेला होता. अखेर सदर ठिकाणी बांधकाम विभागाने नव्याने पूल करत जुन्या व नव्या पुलावरून एकेरी ये जा वाहतूक नुकतीच तीन महिन्यापूर्वी सुरु केली होती. मात्र पुलाचे दुतर्फा नवीन रस्ता निकृष्ट दर्जाचा झाल्याने पाऊस होण्यापूर्वीच तो खराब होऊ लागला होता. जोरदार पाऊस होताच त्यावर खड्डे पडले असून वाहनधारकांची गैरसोय होत आहे. या रस्त्याने दररोज हजारो वाहने जात येत असून खड्डे टाळण्यासाठी आता काही वाहनधारक पुन्हा जुन्या पुलावरून जात असून त्यामुळे किंवा रात्रीच्या वेळी खड्डे ना दिसल्यास वाहने आदळून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभाग पूर्ण दुर्लक्ष करत असून सदर कामाची चौकशी करत संबंधित ठेकेदार यांचेकडून रास्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच नासिक कळवण रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून ते खड्डे भरत रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.