औरंगाबाद, दि. 8 : शहर पोलीस नियंत्रण कक्षातील १०० क्रमांकावर एकदा नव्हे तर तब्बल ७५ कॉल करून महिला पोलीस कर्मचा-याला शिविगाळ करून अश्लील बोलणा-या विकृतास शहर गुन्हे शाखेच्या पथकाने तीन तासात छडा लावला. या विकृतास पैठण तालुक्यातील रहाटगाव येथून या पथकाने पकडून आणले. गुरुवारी(दि़ ७) दुपारी पावणे बारा ते पाच दरम्यान आरोपी हा रहाटगांव येथील शेतातून शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील महिला पोलिसांना फोन करायचा.छगनदेव कारभारी डोईफोडे (२१,रा़. रहाटगांव) असे आरोपीचे नाव आहे़.
अडचणीत सापडलेल्या नागरीकांच्या सेवेसाठी शहर पोलिसांचा नियंत्रण कक्ष रात्रंदिवस सुरू असतो. नियंत्रण कक्षाच्या १०० हा टोल फ्री नंबर आहे. यासोबतच २२४० ५०० हा सुद्धा पोलीस नियंत्रण कक्षाचा क्रमांक आहे. जनतेला तातडीने मदत मिळावी, त्यांच्याशी सुसंवाद साधण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेल्या महिला पोलीस आणि कर्मचारी तेथे रात्रंदिवस कर्तव्य बजावत असतात. गुरूवारी दुपारी ११.४५वाजेच्या सुमारास शहर पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाच्या १०० नंबरवर एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कॉल आला. तेथे कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचा-याने हा फोन उचलला. तेव्हा फोन करणारा व्यक्ती त्याचे नाव सांगत नव्हता, उलट तो महिला पोलीस कर्मचारी यांच्यांशीच अश्लील बोलत होता. तो दारू पिलेला असावा, म्हणून महिला कर्मचा-यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करीत फोन ठेवून दिला.
यानंतर त्या व्यक्तीकडून एकानंतर एक सारखे फोन येऊ लागले आणि तो महिला पोलिसांना घाणेरड्या भाषेत बोलू लागला. पोलिसांनी त्यास समजावून सांगितले, प्रसंगी आम्ही पोलीस असून तुला पकडू, जेलमध्ये डांबू असे धमकावलेही, मात्र त्याचा कोणताही परिणाम त्याच्यावर झाला नाही. एकदा नव्हे तर तब्बल ७५ ते ८० वेळा त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केले. यामुळे वैतागलेल्या महिला कर्मचा-याने हा प्रकार पोलीस उपायुक्त डॉ़ दिपाली घाटे घाडगे यांच्या कानावर घातला.
डॉ. घाडगे यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना बोलावून आरोपीला हजर करण्योच आदेश दिले. यानंतर पो.नि. सांवत यांनी सायबर क्राईम सेलच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला. तो रहाटगांव येथील असल्याचे समजले. यानंतर पोलीस उपनिरीक्षक खटावकर यांच्या पथकाने रहाटगाव येथे जाऊन आरोपी डोईफोडे यास पकडले. त्याच्याविरूद्ध बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.