वाशिम : गावातील हातपंपावर पाणी भरण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये तुंबळ मारहाण झाल्याची घटना २५ एप्रिल रोजी रात्री वाशिम तालुक्यातील पिंपळगाव (डाकबंगला) येथे घडली. वाद वाढून गावातील दलित वस्तीमध्ये आरोपींनी जाळपोळ केली. याप्रकरणी अनसिंग पोलीस स्टेशनमध्ये २२८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ३३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पिंपळगाव येथील दलित वस्तीतील हातपंपावर पाणी भरण्याच्या कारणावरून २५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजतानंतर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या मारहाणीत काही ग्रामस्थ जखमी झाले. या प्रकरणी एका गटातील नामदेव भगवान कांबळे यांनी अनसिंग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. गावातील काही लोकांनी बेकायदेशीररित्या मंडळी जमवून दलित वस्तीवर सशस्त्र हल्ला चढवला. काही घरांमध्ये घुसून, घरातील साहित्याची नासधूसही केली. याशिवाय, आरोपींनी महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी संतोष विठ्ठल दंडे याच्यासह १९७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, २८ आरोपींना अटक केली. दुसर्या गटातर्फे आशा रामेश्वर मद्रासवाड या ३५ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली. सार्वजनिक हातपंपावर पाणी भरण्यासाठी गेले असता आरोपींनी तलवारी, काठय़ा, कुर्हाड, विळे घेऊन पाणी भरण्यासाठी मज्जाव केला. अंगावरील दागिने लुटून नेऊन जीवे मारण्याची धमकीही दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रकाश प्रभू पट्टेबहाद्दूर यांच्यासह २९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली. यावेळी एका जमावाने दलित वस्तीतील घरांची जाळपोळ करून काहींना बेदम मारहाण केली. एसडीपीओ दत्तात्रय वाळके व ठाणेदार कदम यांच्या नेतृत्वात गावात जवळपास २00 पोलीस तैनात असून, सध्या तणावपूर्ण शांतता आहे. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी गावात ठाण मांडून आहेत. जखमींवर वाशिम व अन्य ठिकाणी उपचार सुरू आहेत.
पाण्याच्या वादातून दोन गटात दंगल
By admin | Published: April 27, 2015 1:36 AM