भंडारा : स्वत:चा उद्योग उभारू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना उपयुक्त ठरत असून या योजनेचा लाभ विदर्भातील ४ लाख ६४ हजार नवउद्योजकांना मिळाला आहे. या उद्योजकांना १ हजार २३० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.स्वत:चा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरूकेली. शिशु, किशोर व तरुण या तीन श्रेणीमध्ये योजना विभागण्यात आली असून व्यवसाय तथा उद्योग उभारण्यासाठी शिशु योजनेत ५० हजारांपर्यंत, किशोर योजनेत ५० हजार ते ५ लाखापर्यंत व तरुण योजनेत ५ लाख ते १० लाखापर्यंत कर्ज देण्याची तरतूद आहे. या योजनेंतर्गत कर्ज देताना हमी देण्याची गरज नसल्यामुळे ही योजना नवउद्योजकांसाठी पर्वणी ठरत आहे. राज्यात मुद्रा योजनेंतर्गत १३ लाख ३६ हजार युवकांना ५ हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. या कर्जातून युवक व्यवसाय उद्योग सुरू करणार आहे. बँकांच्या धोरणामुळे छोटे व्यवसाय करणारे, नव्याने व्यवसाय करणाऱ्यांना मुद्रा योजनेमुळे दहा हजार रुपयांपासून तारणाविना कर्जाची व्यवस्था झाली आहे. (प्रतिनिधी)
विदर्भात १,२३० कोटींचे मुद्रा कर्ज वितरित
By admin | Published: October 04, 2016 4:44 AM