मुंबई - महाविकास आघाडीचं जागावाटप निश्चित झालं असलं तरी ते अद्याप जाहीर करण्यात आलं नाही. त्याआधीच उद्धव ठाकरेंकडून उमेदवारांना एबी फॉर्म वाटप सुरू झालं आहे. नाशिकमधील ४ जणांना ठाकरेंकडून उमेदवारी देण्यात आली. त्यात नाशिक मध्य मतदारसंघावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद होता. नाशिक पश्चिम मतदारसंघात सुधाकर बडगुजर आणि नाशिक मध्य मतदारसंघात वसंत गीते इच्छुक होते. या दोघांना ठाकरेंकडून एबी फॉर्म मिळाला आहे. मात्र त्यामुळे काँग्रेस इच्छुक नाराज झालेत.
नाशिक मध्य या मतदारसंघात काँग्रेसच्या हेमलता पाटील या इच्छुक होत्या. नाशिकमध्ये काँग्रेसला एकही जागा सुटलेली नाही. ४ जागा ठाकरेंना तर २ जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत. त्यात नाशिक मध्य मतदारसंघ मविआत काँग्रेसला मिळावा असा प्रयत्न सुरू होता. परंतु त्यावर तोडगा न निघाल्याने ही जागा ठाकरेंना सोडण्यात आली आहे. या मतदारसंघात इच्छुक असणाऱ्या काँग्रेस नेत्या हेमलता पाटील यांनी आज मुंबईत वरिष्ठांशी भेट घेतली. मात्र ठाकरेंकडून या जागेवर उमेदवार घोषित केल्याने नाराज हेमलता पाटील यांनी आपण ही निवडणूक लढवणारच असं सांगितले आहे.
महाविकास आघाडीत पश्चिम नाशिक आणि मध्य नाशिकमधील उमेदवारीबाबत सध्या महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष आक्रमक होते. नाशिक मध्यमध्ये उद्धव सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट तिघांनी प्रतिष्ठेचा प्रश्न केला आहे. अन्य अनेक जागांवर एकमत झाले असले तरी या जागेबाबत मात्र एकमत होत नव्हते. अखेर ही जागा ठाकरेंना सोडण्यात आली आहे. आज नाशिकमधील सुधाकर बडगुजर, वसंत गीते आणि अपूर्व हिरे यांना ठाकरेंकडून एबी फॉर्म देण्यात आले आहेत.
नाशिक मध्य मतदारसंघाची स्थिती काय?
२००४ ते २००९ या काळात नाशिक मतदारसंघात काँग्रेसच्या शोभा बच्छाव आमदार होत्या. २००९ साली मध्य नाशिक मतदारसंघ झाल्यानंतर त्याठिकाणी मनसेचे वसंत गीते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २०१४ पासून आतापर्यंत भाजपाच्या देवयानी फरांदे या मतदारसंघात आमदार आहेत. या मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला होता. मविआच्या जागावाटपात नाशिक मध्य काँग्रेसला मिळावा यासाठी प्रयत्न होते. परंतु ठाकरे गट आणि काँग्रेसच्या रस्सीखेचनंतर हा मतदारसंघात अखेर ठाकरे गटाला सोडण्यात आला आहे.