अहमदनगर - भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यासाठी पंकाजा मुंडे यांना जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. पंकजा मुंडे समर्थकांनी भगवानगडावर मेळावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे रिसतर अर्ज केला होता. पण भडवानगडाचे मंहत आणि ट्रस्टी नामदेवशास्त्री यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला स्पष्ट नकार दिल्याने, आता जिल्हा प्रशासनानेही मेळाव्यास परवानगी नाकारलीय. काल पंकजा मुंडेनी नामदेव शास्त्रींना भावनिक साद घातली होती. यामध्ये त्यांनी पत्र लिहून 20 मिनिटांचा वेळ मागितला होता.
या पत्रात पंकजा मुंडेंनी असे लिहले होतं. की, आज आपल्याकडे आपली लेक एक पहिली आणि शेवटची विनंती करते. लोकांची तळमळ पाहून कोणी मध्यस्थी नको म्हणून मीच विनंती करते, शेवटी मी लहानच आहे. मी लहान होते, तुम्ही मोठे व्हा. काही नको त्यांना फक्त 20 मिनिटं वेळ वर्षातून द्या. ते पुन्हा कोयता घेऊन राबायला जातील, त्यांना ऊर्जा मिळते. मी आतापर्यंत कोणापुढे झुकले नाही, मात्र समाजासाठी नतमस्तक होते. मला दिवाळीची माहेरची भेट द्या.
गेल्या काही दिवसांपूर्वी पाथर्डी येथे झालेल्या दसरा मेळावा कृती समितीच्या बैठकीत पंकजा मुंडे समर्थकांनी महंत शास्त्री यांच्या ‘सुपारी’ची भाषा वापरली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला होता. भगवान गडावर दस-याच्या दिवशी कोणताही राजकीय मेळावा होणार नाही, अशी ठाम भूमिका नामदेव शास्त्री यांनी घेतली होती. शास्त्री यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला पत्र देऊन गडावर राजकीय मेळाव्याला बंदी घालण्याची मागणीही केली होती. या पार्श्वभूमीवर मुंडे समर्थकांचा गडावरच मेळावा घेण्याचा आग्रह आहे. दसरा मेळावा कृती समिती स्थापन झाली असून, गावोगावी बैठका सुरू आहेत. पाथर्डी येथे बैठकीत भाजपाच्या माजी जिल्हा परिषद सदस्याने महंत नामदेव शास्त्री यांच्याविरुद्ध सुपारीची भाषा वापरली होती.