ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 14 - देशभरातील सर्वच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकांना ५00 व १000च्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बॅँकेने सोमवारी मनाई केली. याबाबतचा आदेश सायंकाळी काढला असून, नोटा स्वीकारण्याबरोबरच त्या बदलूनही देता येणार नसल्याने कामकाज पूर्णपणे बंद राहणार आहे. नागरी सहकारी बॅँकांना मात्र नोटा स्वीकारण्याची मुभा कायम ठेवल्याने जिल्हा बॅँकेच्या ग्राहकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
रिझर्व्ह बॅँकेने बुधवारपासून ५00 व १000च्या नोटा चलनात रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन संपूर्ण देशाला हादरा दिला. त्याचे पडसाद समाजातील लहान घटकापर्यंत उमटू लागले आहेत. जिल्हा पातळीवर विशेषत: ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून जिल्हा बॅँकेकडे पाहिले जाते. सामान्यातील सामान्य माणसाचे खाते जिल्हा बॅँकेत आहे. या बॅँकेच्या माध्यमातूनच पेन्शन, शेतकºयांची ऊस बिले, दूध बिले, शिक्षकांचे पगार, आदी व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. ५00 व १000च्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर बुधवारपासून जिल्हा बॅँकेत या नोटा स्वीकारणे व ४000 पर्यंत बदलून देण्याची प्रक्रिया सुरू होती. रेग्युलेशन अॅक्ट कलम ४९ अंतर्गत जिल्हा बॅँकांना अधिकार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते. त्यानुसार गेले पाच दिवस बॅँकांतून काम सुरू होते. दोन दिवसांपूर्वी या नोटा बदलून देण्यास बंदी घातली होती. सोमवारी सायंकाळी रिझर्व्ह बॅँकेने ५00 व १000च्या नोटा स्वीकारता येणार नसल्याचा फतवा काढल्याने खळबळ उडाली. २४ हजारपर्यंत ग्राहकांना पैसे देण्याचे आदेश दिले खरे; पण बॅँकेत पैसेच नसल्याने द्यायचे कोठून? असा प्रश्नही आहे. त्यामुळे सोमवारपासून बॅँकेच्या शाखा बंद करून बसण्याची वेळ आली आहे.
शंभर वर्षांच्या बॅँकांना बंदी कशी
रिझर्व्ह बॅँकेने राष्टÑीयीकृत, खासगी व नागरी सहकारी बॅँकांना नोटा स्वीकारण्याची परवानगी आहे; पण शंभर वर्षे बॅँकिंग क्षेत्रात काम करणाºया व ग्रामीण भागातील सामान्य माणसांशी नाळ असणाºया जिल्हा बॅँकांना बंदी कशी? अशी विचारणा ग्राहकांमधून होत आहे.
ठेवीवर परिणाम होणार?
जिल्हा बॅँकेचे २0 लाख ठेवीदार आहेत. घरातील विविध कारणांसाठी काही पुंजी जमा करून ठेवलेली असते. ती पुंजी जिल्हा बॅँकेत जमा करावयास आल्यानंतर स्वीकारण्यास नकार देणे उचित नाही. त्याचा परिणाम ठेवीवर होईल, अशी भीती जिल्हा बॅँकेतून व्यक्त होत आहे.
कोल्हापूर जिल्हा बँकेला गेल्या पाच दिवसांत मिळालेले पैसे
शुक्रवारी - ५० लाख
शनिवारी-१ कोटी १२ लाख
रविवारी- ३ कोटी
सर्वसामान्य ग्राहक जिल्हा बॅँकेशी संलग्न असल्याने रिझर्व्ह बॅँकेने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा. बॅँकेची अडचण समजावून घेऊन ठेवीदारांनी सहकार्य करावे.
- प्रतापसिंह चव्हाण (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बॅँक)