ऑनलाइन लोकमत
अलिबाग , दि.29 -
रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र नेमीचंद खंडागळे यास सोमवारी संध्याकाळी त्याच्या कार्यालयातच पाच हजार रुपयांची लाच घेतना, सापळा रचून रंगेहाथ अटक करण्यात आली असल्याची माहिती रायगड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधिक्षक सुनील कलगुटकर यांनी दिली आहे. डॉक्टरांनाच अनूभव प्रमाणपत्रे देण्याकरीता लाचेची मागणी एम.बी.बी.एस. पदवी संपादन करुन शासकीय नियमांप्रमाणे ग्रामीण भागात प्रत्यक्ष सेवा देण्याकरीता रायगड जिल्ह्यात कार्यरत एका डॉक्टरना 13 फेब्रुवारी 2015 ते 11 फेब्रुवारी 2016 या 364 दिवसांच्या कालावधीचे शासकीय नियमाप्रमाणे अनूभव प्रमाणपत्रे देण्याकरीता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र खंडागळे याने त्या नविन डॉक्टरांकडे 5 हजार रुपयांची लाच मागीतली होती. या बाबत त्या नविन डॉक्टरांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली होती. तक्रारीची खातरजमा करुन रितसर सापळा रचून नवीन डॉक्टरांकडून 5 हजार रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधिक्षक बी.आर.दळवी यांच्या पथकाने डॉ.खंडागळे यास रंगेहाथ पकडले आहे. पदाचा पदभार देण्याकरीता वैद्यकीय अधिकारीच रायगड परिषदेच्या आरोग्य विभागात अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी व सहाय्यक जिल्हा वैद्यकीय अधिकारी ही रिक्त असल्याने सोमवारी ़डॉ.खंडागळे यास अटक केल्यावर त्याचा जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा पदभार देण्याकरीता वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याने मोठा बाका प्रसंग रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य यंत्रणेवर आला आहे. दरम्यान अटक करण्यात आलेला डॉ.राजेंद्र खंडागळे हा मुळचा अहमदनगर येथील राहाणारा असून त्यांच्या अहमदनगर मधील घरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे.