लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : इयत्ता दहावीच्या परीक्षेत विविध विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा शनिवारी करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. विभागातील एकूण ३४ पुरस्कारांमध्ये पुण्याला २६, सोलापूर जिल्ह्याला ३ तर अहमदनगरला ५ पुरस्कार मिळाले आहेत.देणगीदारांनी दिलेल्या निधीतून पुणे विभागाकडून मराठी, कन्नड, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, गणित, विज्ञान व समाजशास्त्र आदी विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना विविध पुरस्कार दिले जातात. यंदा शिरूरच्या विद्याधाम प्रशालेचा विद्यार्थी देवेंद्र संतोष वेताळ यास मराठी प्रथम भाषेत प्रथम आल्याबद्दल तब्बल ८ पुरस्कार मिळाले आहेत. मराठीमध्येच मुलींमध्ये प्रथम आल्याबद्दल नगर जिल्ह्यातील पारनेरमधील श्री गोरेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या प्रियांका नरसाळे या विद्यार्थिनीला दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. संतोष व प्रियांका या दोघांनाही मराठीत प्रत्येकी ९६ गुण मिळाले आहेत. त्यांना एकूण अनुक्रमे ९८.६० आणि ९५.२० टक्के गुण मिळाले आहेत.कोथरूडच्या एमईएस बाल शिक्षण मंदिर शाळेतील अनन्या जोशी ही मराठी द्वितीय भाषा विषयात प्रथम आल्याबद्दल पुरस्कार मिळाला असून तिला ९६ गुण मिळाले आहेत. राज डागा या कसबा पेठ येथील आर. सी. मेहता गुजराथी हायस्कूलच्या विद्यार्थ्याला गुजराथी प्रथम भाषा विषयासाठी पुरस्कार मिळाला आहे. कन्नड भाषेसाठी डॉ. शामराव कलमाडी हायस्कूलच्या नेत्रावती पुजारी या विद्यार्थिनीस, तर हिंदी विषयासाठी पुरंदर येथील श्री कानिफनाथ विद्यालयाच्या शिवानी काटके या विद्यार्थिनीस पुरस्कार मिळाला आहे. बारामतीच्या एमईएस हायस्कूलच्या अभिषेक ढालपे याला इंग्रजी व गणित विषयासाठी, तर विज्ञान विषयात १०० पैकी १०० गुण मिळाल्याबद्दल एकूण चार पुरस्कार जाहीर झाले आहेत. याच इंग्रजी विषयात मुलींमध्ये प्रथम आल्याबद्दल बार्शी येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या प्रतीक्षा वाघमारे हिला तर रात्रशाळेमधून प्रथम आल्याबद्दल नगर येथील भाई सथ्था नाईट स्कूलच्या महेश शिंदे याने पुरस्कार पटकावला आहे.
विभागीय पुरस्कारांमध्ये जिल्ह्याची आघाडी
By admin | Published: June 25, 2017 5:08 AM