सोलापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळ विस्तारात महाविकास आघाडीत सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराला मंत्रीपद मिळाले नाही. तर सोलापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना सुद्धा डावलण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याची पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीच्या पहिल्या दिवसापासून प्रणिती शिंदे यांचे नाव आघाडीवर होते. तसेच प्रणिती यांची मंत्रीपदी वर्णी लागणार असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना होता. मात्र सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीत प्रणिती शिंदे यांचे नाव डावलण्यात आले.
तर आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून, राजीनामे देण्याच्या तयारीत आहे. तसेच युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधींना रक्ताने पत्र लिहुन न्याय देण्याची मागणी केली आहे. या पद्धतीने आता युवक काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आपल्या रक्ताने पक्षाध्यक्षांना पत्र लिहिणार असल्याचे सुद्धा ते म्हणाले.
काँग्रेस पक्षासाठी आयुष्य वाहिलेले सुशिलकुमार शिंदे यांनाही राज्यसभा निवडणुकीत डावलले होते. आता आमदार प्रणिती शिंदे यांनाही मंत्रीपद न दिल्याने काँग्रेस कार्यकर्ते नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रणिती यांना न्याय मिळाला नाही तर सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी सामूहिकरीत्या राजीनामे देणार आहे. मात्र आपण नाराज नसल्याची प्रतिक्रिया प्रणिती शिंदे यांनी माध्यमांना दिली आहे.