आविष्कार देसाई,
अलिबाग- जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येचा रेशो मेन्टेन करण्याचा परिणाम हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्य संख्येवर झाला आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ही ६२ वरून घसरून ६१ वर आली आहे. मात्र पनवेलला याचा सर्वाधिक फायदा झाल्याने तेथील सदस्य संख्या सहाने वाढून १६ झाली आहे. काही मतदार संघ घटल्याने दिग्गजांना फटका बसला आहे, तर काही ठिकाणी नव्याने वाढलेल्या मतदार संघामुळे इच्छुकांची राजकीय महत्त्वाकांक्षा फळाला येण्याची शक्यता आहे.काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांची स्थिती कशी असेल, हे जाहीर केले होते. त्यामध्ये ६२ सदस्यांची जिल्हा परिषद ६१ सदस्यांची झाल्याचे समोर आले. जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या का कमी झाली, पनवेल तालुक्यातीलच सदस्यांची संख्या का वाढली, असे विविध प्रश्न रायगडच्या जनतेला पडले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य कमी जास्त होण्यासाठी कोणीच जबाबदार नसून ते लोकसंख्येच्या गणितीय सूत्रानुसार ठरलेले आहे. हे सूत्र ठरविताना पुणे जिल्ह्याची (क्ष) सर्वाधिक लोकसंख्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची (य) सर्वाधिक कमी लोकसंख्या गृहीत धरली आहे. त्या निकषानुसार पुणे जिल्ह्यासाठी ७५ जिल्हा परिषद सदस्य आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ५० जिल्हा परिषद सदस्य मर्यादा आखलेली आहे.पुणे जिल्ह्याची लोकसंख्या ३८ लाख ४७ हजार ३३२, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या ७ लाख ३८ हजार ४४७ अशी आहे. क्ष वजा य भागीले २५ (३८,४७,३३२ वजा ७, ३८,४४७ भागीले २५) ३१,०८८८५ भागीले २५ बरोबर १,२४,३५५ या सूत्रानुसार रायगडची लोकसंख्या २१,३७,८३१ वजा सिंधुदुर्गची लोकसंख्या ७,३८,४४७ बरोबर १३,९९,३८४. याच १३,९९,३८४ ला १,२४,३५५ ने भागल्यास ११.२५ असा रेशो येतो. त्यानुसार कमीतकमी असणारी सदस्य संख्या ५० अधिक ११.२५ बरोबर ६१ ही संख्या मिळते. तीच रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या राहणार आहे, तर त्याच्या दुप्पट १२२ पंचायत समितीचे सदस्य संख्या येते. एका जिल्हा परिषद मतदार संघासाठी सुमारे ३५ हजार मतदार आहेत, पंचायत समितीसाठी १७ हजार ५०० मतदार असणार आहेत.>लोकसंख्येच्या सूत्रानुसारच जिल्हा परिषद सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. हेच सूत्र सर्वत्र लावण्यात आले आहे. रेशो मेन्टेन करताना रायगड जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ६१ आली आहे.-किरण पाणबुडे, उपजिल्हाधिकारी, रायगड