पुणे :पीक विमा कंपन्यांच्या नफेखोरीमुळे मराठवाड्यातील शेतकºयांना नुकसानीचा परतावा मिळत नाही, विमा कंपन्यांच्या फायद्यासाठीच सरकार धोरण राबवित असून, यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान पीक विमा योजना आढावा बैठकीत घोषणाबाजी केली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत बोलत असतानाच घोषणाबाजी झाल्याने काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलीसांनी हस्तक्षेप करीत आंदोलकांना सभागृहाबाहेर काढले. कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी याचा समाचार घेताना कोठेही घाण पडली की माध्यमे तेथे धावतात. त्यांनी शेतकºयांना दिल्या जात असलेल्या मिठाईकडे लक्ष द्यावे अशी उपमा देत आंदोलक आणि माध्यमांची खिल्ली उडविली. पुणे विद्यापीठ रस्त्यावरील वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थेत बुधवारी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची आढावा बैठक आयोजित केली होती. कृषीमंत्री बोंडे, राज्यमंत्री खोत, महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी, वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिष भुतानी, सचिव (कृषी व जलसंधारण) एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे आणि राज्यातील शेतकरी प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. कृषी राज्यमंत्री खोत यांचे भाषण सुरु असताना दुपारी बाराच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सौरभ वळवडे, सूरज पंडीत, पूजा झोळ यांच्यासह पाच ते सहा कार्यकर्त्यांनी पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करुन घोषणा दिल्या. त्या मुळे काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलीसांनी आंदोलकांना बाहेर काढल्यानंतर कार्यक्रम पुन्हा सुरु झाला. कृषी मंत्री बोंडे यांनी आपल्या भाषणात आंदोलकांचा समाचार घेतला. बोंडे म्हणाले, पीक विमा योजनेतील त्रुटींबाबत ही बैठक बोलावण्यात आली होती. चार-दोन लोक उठून गोंधळाचे चित्र निर्माण करुन सभा उधळून लावण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा हेतू हा गोंधळाचे चित्र राज्यभर पसरविण्याचा आहे. आंदोलकांनी चर्चा करायला हवी होती. त्यांच्या कृतीने ते शेतकरी विरोधक असल्याचे वाटते. माध्यमे देखील कोठेही घाण पडली की तेथे धावतात. त्यांनी घाणीकडे नव्हे तर शेतकºयांना देत असलेल्या मिठाईकडे लक्ष दिले पाहीजे. त्यांनी सकारात्मक भावना दाखवायला हवी. बैठकीनंतर पत्रकारांनी बोंडे यांना घाणीच्या उपमेबाबत विचारले असता. घाणीवर माशा घोंघावण्यापेक्षा मिठाईवर घोंघावत असलेल्या चांगल्या असे म्हणाल्याची सारवासारव त्यांनीकेली. तसेच, विमा योजनेत घोळ आढळल्यास संबंधित विमा कंपन्यांवर देखील कारवाई करु असे त्यांनी सांगितले.
पुण्यात सदाभाऊ खोत यांच्या भाषणावेळी गोंधळ, पीक विमा योजना फसवी असल्याच्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 1:18 PM