औरंगाबाद/कचनेर : गावाला विहिरीचे पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून संतापलेल्या एकोड-पाचोड (ता. औरंगाबाद) येथील २०० गावकऱ्यांनी रविवारी लाठ्या-काठ्या घेत गावाजवळील ब्रम्हानंद महाराज मठाच्या १५ एकरवरील पिकांची नासधूस केली. शेतातील इंजिन जाळून वाहनांची मोडतोड केली तसेच मजुरांचे संसार उद्ध्वस्त केले.चिकलठाणा पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला असून सहा गावकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. ब्रम्हानंद महाराज मठाला मिळालेल्या इनामी जमिनीवर गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर आहे. मात्र या विहिरीचे पाणी गावाला देण्यात मठाच्या प्रशासनाकडून अडथळे आणले जात असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. रविवारी जमावाने तब्बल दोन तास धुडगूस घालत पिकांची नासधूस व जाळपोळ केली. शेतीला पाणी पुरवठा करता, मग गावाला का नाही? पाण्यात घाण व कीटकनाशक का टाकले, याचा जाब विचारत लाठ्या-काठ्या व कुऱ्हाडी घेऊन आलेल्या जमावाने मठाच्या ३० एकर इमानी जमिनीमधील ठिबक सिंचन संच जाळून पाईपलाईन फोडली. १५ एकरवरील ११ हजार शेवग्यांची झाडे तोडली. पाच हजार डाळिंबाची छोटी झाडे उपटून टाकली. ट्रॅक्टर, टेम्पोवर मोठे दगड घातले. दुचाकींची मोडतोड केली. इंजिन पेटविले. जमावाच्या हल्ल्यात येथील मजुरांचे संसार उद्ध्वस्त झाले.ब्रम्हानंद महाराज मठाचे मदन विलास पुरी (रा. आपतगाव) यांच्या फिर्यादीवरून बाबासाहेब घोडके, विजय घोडके, रावसाहेब मदगे, एकनाथ घोडके, मैनाजी पिवळ, रामभाऊ घोडके, राधाकिसन मदगे, निवृत्ती घोडके, लक्ष्मण घोडके, किशोर घोडके, ज्ञानेश्वर मदगे, बाबासाहेब शिंदे यांच्याविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, सहायक पोलीस निरीक्षक प्रिया थोरात यांनी घटनास्थळाची पाहणी केली. गावात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.आपतगावच्या (ता. औरंगाबाद) ब्रम्हानंद महाराज मठाचे महाराज मदन विलास पुरी यांना त्यांच्या आजोबांच्या काळात पाचोड येथील गावकऱ्यांनी काही इनामी जमीन दिली होती. ही ५२ एकर जमीन महाराजांनी विकसित केली आहे. मदन पुरी त्याची व्यवस्था सांभाळतात. येथे दोन विहिरी आहेत. त्यातील एका विहिरीतून गावाला पाणी पुरवठा केला जातो. मागील काही दिवसांपासून गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी शेताला दिले जाते. त्यामुळे गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. विहिरीत कीटकनाशक टाकण्यात आले असून पाण्याला घाण वास येतो. गावाला पाणी देण्यास अडचणी निर्माण केल्या जात असल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे. (प्रतिनिधी)
औरंगाबाद तालुक्यात पाण्यावरून दंगल
By admin | Published: January 11, 2016 2:36 AM