रोहा, दि. ४ - दिवा - सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला नागोठणेजवळ अपघात झाला असून या अपघातात नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ४० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींचा आकडा वाढण्याची भिती असून कुर्ला व कल्याणहून मेडिकल रिलिफ ट्रेन रोहाच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. रविवारी सकाळी दिवा स्थानकाहून सावंतवाडीसाठी पॅसेंजर ट्रेन रवाना झाली होती. पावणे दहाच्या सुमारास नागोठणेजवळील भिसेखिंड येथील बोगदा ओंलाडल्यावर इंजिनसह गाडीचे चार डबे रुळावरुन घसरले. या भीषण अपघातात नऊ प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातामुळे कोकण रेल्वेवरील वाहतूक ठप्प पडली आहे. या अपघातामुळे कोकण रेल्वेवरील नऊ एक्सप्रेस गाड्या अन्य मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत. तर दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी कोकण रेल्वेने रोहा - पनवेल या मार्गावर जादा एसटी बसेस सोडल्या आहेत. दरम्यान, या अपघातातील मृतांना व जखमींना रेल्वे प्रशासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
दिवा - सावंतवाडी पॅसेंजरला अपघात, नऊ ठार
By admin | Published: May 04, 2014 2:11 PM