औरंगाबाद : वर्षांनुवर्ष थेंब थेंब पाण्यासाठी आसुसणाऱ्या दुष्काळग्रस्त मराठवाड्यातून थेट विशाखापट्टणमपर्यंत जलवाहतूक सुरू करण्याचे दिवास्वप्न केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे दाखविले. कोरड्या गोदावरीतून जहाजे धावतील तरी कशी, असा प्रश्न गडकरींच्या घोषणेनंतर मराठवाड्यातील जनतेला पडला. औरंगाबाद व परिसरातील राष्ट्रीय महामार्ग आणि केंद्रीय रस्ते निधीतून करण्यात येणाऱ्या हजारो कोटी रुपयांच्या रस्ते विकासकामांचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते चिकलठाणा येथे झाले. गडकरी यांनी आगामी काळात दळणवळण क्षेत्रात होऊ घातलेल्या धोरणात्मक विकासमार्गांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, देशातील प्रमुख नदी पात्रांत जलवाहतूक सुरू करण्याच्या दिशेने केंद्राने पाऊल उचलले आहे. गंगा नदीच्या पात्रात ते काम सुरू केले आहे. नदीच्या पाण्यात विमाने उतरतील. १११ नद्यांतील जलवाहतूक मार्गांना मंजुरी मिळाली आहे. ३६ नद्यांतील जलवाहतूक मार्ग प्रकल्प अहवाल तयार झाला आहे. नांदेडच्या गोदावरीतून थेट विशाखापट्टणमच्या समुद्रात जलवाहतूक सुरू करण्याचे आपण ठरविल्याचे त्यांनी जाहीर केले. दोन वर्षांत सर्व गाड्या पूर्णत: इलेक्ट्रॉनिक बॅटरीवर चालतील. प्रदूषणमुक्त भारताचे स्वप्न त्यातून पूर्ण होणार आहे. वॉटरपोर्ट, बसपोर्ट, ड्रायपोर्ट या विकासमार्गांमुळे शेतकरी, तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न सुटतील. राज्यात ५ लाख कोटींचे रस्ते विकसित करण्याचा कार्यक्रम तयार केला आहे, असा दावाही त्यांनी केला. (प्रतिनिधी)घोषणांवर चर्चा अर्ध्या तासाच्या भाषणात गडकरी यांनी भविष्यातील अनेक प्रस्तावित प्रकल्पांच्या घोषणा केल्या. त्यांच्या घोषणांपैकी १० टक्के कामे प्रत्यक्षात झाली तरी खूप झाले, अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती. भूमिपूजन केलेले रस्ते प्रत्यक्षात कधी येणार, असाही सवाल उपस्थित होत आहे. -------------------------------------------------ड्रायपोर्ट मराठवाड्याच्या विकासात मैलाचा दगड!जालना : पाणी नसलेल्या ठिकाणी ड्रायपोर्ट ही संकल्पना लक्षात आल्यानंतर त्या माध्यमातून मागास भागाचा विकास होण्यासाठी जालना व वर्धा येथे ड्रायपोर्ट प्रकल्पाला मान्यता दिली. जालन्यातील ड्रायपोर्टमुळे स्टील उद्योगासह कृषी क्षेत्राला चालना मिळेल. हा प्रकल्प मराठवाड्याच्या विकासात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. देशातील पहिल्या ड्रायपोर्टचे गडकरी यांनी भूमिपूजन केले. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर, संचालक विवेक देशपांडे, राम भोगले, उद्योगपती बद्रीनारायण बारवाले आदी उपस्थित होते. गडकरी म्हणाले की, पोर्टच्या धर्तीवर ड्रायपोर्ट असावा ही संकल्पना अनेक दिवसांपासून मनात होती. रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री असताना त्यांनी त्याबाबत चर्चा केली. हा ड्रायपोर्ट रेल्वेने जेएनपीटीशी जोडण्यात येणार आहे. जालन्यात तेल रिफायनरीही उभारता येईल.
कोरड्या गोदेतून वाहतुकीचे ‘दिवास्वप्न’
By admin | Published: December 26, 2015 1:47 AM