सुशांत मोरे, मुंबई मडगावजवळील बाली स्थानकाजवळ बोगद्यात एलटीटी-एर्नाकुलम दुरोन्तो एक्सप्रेसचे १० डबे घसरले आणि कोकण मार्गावर रुळावरून घसरण सुरूच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. कोकण मार्गावर घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा या मार्गावरून जाणाऱ्या ट्रेनचा पुरता खोळंबा उडाला. या मार्गावरील अपघातांची माहिती घेतल्यास आॅक्टोबर २0१३ पासून ते आतापर्यंत रुळावरून ट्रेन घसरल्याच्या सहा घटना घडल्या असून, यामध्ये मालगाड्यांचाही समावेश आहे. अशा घटनांमुळे दुहेरी मार्ग उपलब्ध नसल्याने कोकण रेल्वेला अन्य मार्गाने गाड्या वळविण्याचे प्रताप करावे लागतात आणि त्यामुळे हा प्रवास प्रवाशांना नकोसा होतो. एकच रेल्वेमार्ग उपलब्ध असल्याने एखादी दुर्घटना कोकण रेल्वेमार्गावर घडल्यास कोकण रेल्वे पूर्णपणे ठप्प होते. त्याचा फटका मध्य रेल्वेलाही बसतो. यामुळे दुहेरी मार्ग असावा अशी मागणी होत असून, मध्य रेल्वेकडून दुहेरी मार्गाचे काम वेगाने केले जात आहे. दुहेरी ट्रॅकचे काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने कंबर कसली असून पेण ते रोहा टप्प्यातील आप्टा ते कासू या ३४ किलोमीटरच्या दुहेरी ट्रॅकचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र कोकण रेल्वे मार्गावर दुहेरीकरणाचा प्रकल्प अजूनही मार्गी लागलेला नाही. त्यामुळे महत्त्वाच्या असलेल्या कोकण मार्गावर दुहेरीकरण होणार कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोकण रेल्वेकडून कोलाड ते ठोकूर या ७४१ किलोमीटरच्या मार्गावर दुहेरीकरणाचा प्रस्ताव तयार करतानाच तो रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. या दुहेरी मार्गासाठी १,५०० कोटी रुपये खर्च येणार असून हा मार्ग रोहा ते करंजाडी आणि बैंदूर ते ठोकूर असा टप्प्याटप्प्यात केला जाणार आहे. मात्र या प्रस्तावाबाबत अजूनही काहीएक हालचाली झालेल्या नाहीत.
रुळावरून ‘घसरण’ अजूनही सुरूच
By admin | Published: May 04, 2015 2:05 AM