नागपूर : राज्यात आॅटिझम (स्वमग्नता) या आजाराने पीडित रुग्णांना दिव्यांगांसाठीच्या सवलतीचा लाभ मिळणार आहे. दिव्यांगांच्या सवलतीसाठीच्या कायद्यात आॅटिझमचा समावेश केला आहे. दोन-तीन महिन्यात याबाबतचे सॉफ्टवेअर तयार होईल. त्यानंतर पुढील सहा महिन्यात या आजाराचे प्रमाणपत्र संबधित रुग्णांना वितरित करण्यात येणार असून त्यांना दिव्यांग म्हणून असलेल्या सर्व सवलतींचा लाभ घेता येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सोमवारी विधानसभेत दिली.दिव्यांगांच्या यादीत आॅटिझम या आजाराला समावेश नसल्याने अशा रुग्णांना सामाजिक आणि शासकीय पातळीवर अडचणींचा सामना करावा लागतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली. यावरील चर्चेला उत्तर देताना सावंत म्हणाले की, हा आजार प्रामुख्याने मूल गर्भाशयात असतानाच होतो. या मुलांवर उपचार करण्यासाठी बालरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, स्पीच थेरेपिस्ट, फिजीओथेरपिस्ट या तज्ज्ञांची गरज लागते.
आॅटिझमग्रस्तांना दिव्यांगांच्या सवलती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 4:29 AM