नाशिक : मी वयाने मोठा असलो, तरी गायनातल्या अधिकारात प्रभाताई सर्वार्थाने मोठ्या आहेत. त्या जे गातात, तसे वातावरण आजूबाजूला निर्माण झाल्याचा आभास निर्माण होतो, एवढी अद्वितीय ताकद परमेश्वराने त्यांच्या स्वरांना दिली आहे, अशा शब्दांत पंडित जसराज यांनी शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचा गौरव केला. पं. जसराज यांच्या हस्ते अत्रे यांना पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे यंदाचे तिसरे वर्ष होते. यापूर्वी किशोरी आमोणकर व पं. जसराज यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. पाच लाख रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.पं. जसराज म्हणाले, साठ वर्षांपूर्वी प्रभातार्इंशी पहिल्यांदा भेट झाली. तेव्हाही त्या आजइतक्याच चांगल्या गात होत्या. त्यांनी गायलेला पुरिया कल्याण राग अजूनही स्मरणात आहे. त्या ‘होवन लागी सांज’ गात होत्या, तेव्हा जणू खरोखरच संध्याकाळ झाली आहे, असा भास होत होता.डॉ. प्रभा अत्रे यांनी प्रारंभी राज्य शासनाने आपली उशिरा दखल घेतल्याबद्दल किंचित नाराजी व्यक्त केली; मात्र ही आपलीच माणसे असल्याने त्यांना सांभाळून घेऊ, अशी पुस्तीही जोडली. हा माझा नव्हे, तर शास्त्रीय संगीताचा, साधनेचा, आई-वडील, गुरू आणि सर्व श्रोत्यांचा सन्मान आहे. गुरूंनी भरभरून दिल्याने गायिका होऊ शकले. संगीताने मला खूप काही दिले. आज रक्ताची माणसे नाहीत; पण सुरांनी अनेक घट्ट नाती जोडली आहेत, अशा कृतार्थ शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. (प्रतिनिधी)
प्रभातार्इंच्या स्वरांमध्ये ईश्वरीय ताकद
By admin | Published: February 16, 2015 3:18 AM