पुणे : ‘तुमचे प्रकरण मी मिटवून देतो व तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडून घटस्फोट घेऊन देतो. तुम्ही त्यासाठी मला दहा हजार रुपये द्या,’ ही मागणी केली आहे कौटुंबिक न्यायालयातील एका शासकीय समुपदेशकाने पिडीत महिलेकडे... न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज आल्यानंतर पती-पत्नीशी संवाद साधून त्यांच्यात पुन्हा समेट घडवून आणण्यासाठी समुपदेशकांनी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. मात्र, कौटुंबिक न्यायालयातील काही समुपदेशक पैशांची मागणी करत घटस्फोट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. एका पीडित महिलेने याबाबत न्यायालयाकडे लेखी तक्रार केली आहे.टिळक चौकाजवळील भारती विद्यापीठ भवनमध्ये सातव्या व नवव्या मजल्यावर कौटूंबिक न्यायालयाचे कामकाज चालते. न्यायालयात अनेक प्रकरणे घटस्फोटाशी संबंधित असतात. सध्या या न्यायालयात ५ न्यायाधीश असून १० समुपदेशक आहेत. शासनाने या समुपदेशकांची नियुक्ती केलेली आहे. न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल झाल्यानंतर तो न्यायाधीशांसमोर जातो. घटस्फोटासाठी अर्ज आल्यानंतर न्यायाधीश तो अर्ज पहिल्यांदा एका समुपदेशाकडे पाठवितात. पती किंवा पत्नीने अर्ज केला असला तरी दोघांमध्ये समेट घडून यावा, हा त्यामागचा उदेश असतो. समुपदेशकांनीही यालाच प्राधान्य देत पती-पत्नीशी संवाद साधणे अपेक्षित आहे. दोघांशी चर्चा करून, दोन्ही बाजु ऐकून घेत त्यांना घटस्फोटापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असते.प्रयत्न करूनही तडजोड होत नसेल तर मग तसा अहवाल समुपदेशकांकडून न्यायालयाला सादर केला जातो. त्यानंतर पुढील सुनावणी सुरू होते. मात्र, न्यायालयातील काही समुपदेशक काही प्रकरणांमध्ये समेट घडवून आणण्याऐवजी घटस्फोटासाठी प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. एका महिलेने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायालयाने त्यांच्या प्रकरणात एका समुपदेशकाची नेमणुक केल्यानंतर त्या काही दिवसांपुर्वी समुपदेशांकडे गेल्या. त्यावेळी संबंधित समुपदेशकाने त्यांच्याकडे घटस्फोट मिळवून देण्यासाठी थेट १० हजार रुपयांची मागणी केली. ‘माझी पैसे देण्याची परिस्थिती नाही,’ असे महिलेने सांगितल्यानंतर ‘नवऱ्याकडून पैसे घेवून द्यावेत,’ असा सल्ला समुपदेशकाने दिला. तसेच त्याशिवाय या प्रकरणात तडजोड होवू देणार नाही, असेही महिलेले सुनावले. याबाबत संबंधित महिलेने न्यायालय व कौटूंबिक न्यायालय बार असोसिएशनकडे लेखी तक्रार केली आहे. समुपदेशकांना पैसे देण्याची परिस्थिती नसल्याने दुसऱ्या समुपदेशकाची नेमणुक करावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे.(प्रतिनिधी)
घटस्फोट हवाय, १० हजार द्या!
By admin | Published: January 11, 2016 1:31 AM