पुणे : घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला असेल, तर वारंवार कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. मात्र, पुणे दिवाणी न्यायालयाने ही जुनी परंपरा मोडत प्रथमच आॅनलाइन सुनावणी घेत, ‘स्काइप’चा वापर करण्यास परवानगी दिली. घटस्फोटासाठी अर्ज करणाऱ्या महिलेला ‘स्काइप’वरून बाजू मांडण्याची परवानगी न्यायालयाने दिलीच; शिवाय न्यायालयाने घटस्फोटालाही मंजुरी दिली. अशा प्रकारे ‘स्काइप’च्या माध्यमातून घटस्फोट होण्याची ही पहिलीच घटना आहे. या दाम्पत्याने एकमेकांच्या सहमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. शनिवारी पती सुनावणीला हजर राहण्यासाठी सिंगापूरहून भारतात आला. मात्र, वैयक्तिक कारणांमुळे पत्नीला लंडनहून येणे शक्य नव्हते. या वेळी न्यायालयाने जुन्या परंपरेप्रमाणे पुढची तारीख न देता, नेहमीपेक्षा वेगळा निर्णय देत, ‘स्काइप’वरून आपली बाजू मांडण्याची परवनागी या महिलेला दिली. या दाम्पत्याने प्रेमविवाह केला होता. एकाच कॉलेजमध्ये शिकत असताना दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. त्या वेळी त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. दोघांनी २०१६मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला. यानंतर महिला लंडनला निघून गेली. वकिलाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी व्हावी, अशी विनंती केली असता, न्यायालयाने ती मान्य केली. (प्रतिनिधी)पती न्यायालयात उपस्थित असताना, पत्नी ‘स्काइप’च्या माध्यमातून आपली बाजू मांडत होती. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने हा घटस्फोट मंजूर केला. करियरसाठी घटस्फोट२०१५मध्ये अमरावती येथे लग्न केल्यानंतर, दोघेही पुण्याला आले. हिंजवडीत वेगवेगळ्या कंपनीत दोघेही कामाला होते. महिन्याभरानंतर दोघांनाही परदेशी जाण्याची संधी मिळाली. पतीला सिंगापूर तर पत्नीला लंडनमध्ये जाण्याची संधी मिळाली. पती सिंगापूरला निघून गेला. मात्र, पत्नीला येथेच थांबावे लागले. आपले लग्न करिअरच्या मार्गात अडथळा ठरू लागल्याचे तिने अर्जात म्हटले होते.
‘स्काइप’वरून घटस्फोटाची सुनावणी व मंजुरीही
By admin | Published: May 02, 2017 5:21 AM