जळगाव : ‘तलाक’ घेण्यावरून येथे एकाने पत्नी व मुलांना कोर्टाच्या आवारातच बडदण्याचा प्रकार येथे शुक्रवारी घडला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंकडील नातेवाइकांना पोलीस स्टेशनमध्ये नेले.पती-पत्नीचा कौटुंबिक वाद येथे भर चौकात चव्हाट्यावर आला. पतीने पत्नी व दोन मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केल्याने लोकांनी गर्दी केली. न्यायालयात उपस्थित असलेल्या पोलिसांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला मात्र प्रकरण हाताबाहेर गेल्याने त्यांनी शहर पोलिसांना बोलाविल्यानंतर तणाव निवळला.मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री अकराउत येथील समर मुसा पिंजारी यांचा मरीयम यांच्याशी १४ वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. त्यांना जावेद व अल्ताफ ही मुले आहेत. दोघांचा संसार सुरळीत सुरू असताना गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात बिनसले. त्यातच समर कर्जबाजारी झाल्याने वाद अधिकच वाढला. कर्ज फेडण्यासाठी त्याने पत्नीच्या वडिलांकडून तीन लाख रुपये मागितले. वडिलांना कर्करोग असतानाही त्यांनी दीड लाख रुपये दिल्याचे मरीयम यांचा भाऊ सलीम पिंजारी यांनी सांगितले.दोघांमधील हा वाद जळगाव कोर्टात पोचला. शुक्रवारी तारखेच्या निमित्ताने दोघांकडील नातेवाईक समोरासमोर आले. समरने पत्नीशी घटस्फोट घ्यायचा असल्याचे सांगितले, तर मरीयम यांचा त्यास विरोध होता. त्यातून कोर्टाच्या आवारातच बाचाबाची झाली. त्यातच समरने त्याच्या पत्नीच्या काकाशीही भांडण केले, त्यातून वाद अधिकच चिघळला. त्यानंतर त्याने पत्नी व मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली.समरने एका मुलाचा गळा दाबला, मात्र ऐनवेळी शहर पोलीस आल्याने तणाव निवळला. पोलीस दोन्ही बाजूच्या नातेवाईकांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. या प्रकाराचा सर्वत्र निषेध होत आहे. (प्रतिनिधी)
‘तलाक’साठी पत्नी, मुलांना कोर्ट आवारातच मारहाण
By admin | Published: May 23, 2015 1:27 AM