मुंबई : घटस्फोटीत महिला तिच्या पतीचे किंवा स्वत:च्या वडिलांचेही आडनाव लावू शकते, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे़ महत्त्वाचे म्हणजे घटस्फोटानंतर पतीचे आडनाव लावण्यास प्रतिबंध करणारा कोणताही कायदा नाही़ पतीचे आडनाव लावण्यासाठी त्याच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे, असादेखील नियम नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे़न्या़ अभय ओक व न्या़ अनिल मेनन यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे़ यासाठी पुणे येथील ६२वर्षीय महिलेने अॅड़ असीम सरोदे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती़ या महिलेला पुणे पारपत्र कार्यालयाने २००२मध्ये पारपत्र दिले होते़ याचे नूतनीकरण करण्यासाठी या महिलेने ६ मार्च २०१२ रोजी कार्यालयाकडे अर्ज केला़मात्र २००३मध्ये तुमचा घटस्फोट झाला आहे़ तरीही तुम्ही पतीचे आडनाव लावत आहात़ तेव्हा या नावे पारपत्र घेण्यासाठी तुम्ही पतीकडून ना हरकत पत्र घ्यावे, असे या कार्यालयाने महिलेला पत्र धाडले़ हे पत्र बेकायदा असून ते रद्द करावे, अशी मागणी महिलेने याचिकेत केली़ याची दखल घेत न्यायालयाने पारपत्र कार्यालय व केंद्र सरकारला नोटीस जारी केली़ याचे प्रत्युत्तर या दोन्ही प्रतिवादींनी दिलेले नाही़ त्यानंतर या याचिकेवर अंतिम सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले़ या सुनावणीलाही या प्रतिवादींचे वकील हजर राहिले नाहीत़ अखेर न्यायालयाने वरील निर्वाळा देत पुणे पारपत्र कार्यालयाचे पत्र बेकायदा असल्याचे नमूद करीत रद्दबातल ठरवले़ (प्रतिनिधी)
घटस्फोटीता पतीचे नाव लावू शकते
By admin | Published: January 16, 2015 6:16 AM